Hit And Run Case । ‘हिट अँड रन’ प्रकरणी पुणे पुन्हा हादरलं! वेगवान कारच्या धडकेत पोलिसाचा जागीच मृत्यू

Hit And Run Case । राज्यात दररोज कुठे ना कुठे अपघात घडत असतात. या अपघातात अनेकांचा बळी जातो. पुण्यात कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात ताजा असताना आता मुंबईतील वरळीत हिट अँड रन प्रकरण घडले होते, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातील बोपोडी भागात एक हिट अँड रन प्रकरण घडल्याने पुणे शहर पुरते हादरून गेले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री दोन दुचाकीवरील पोलीस बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या पोलिसाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेने पोलिस दलात हळहळ निर्माण झाली आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुण्यात हिट अँड रन प्रकरणे वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. यावर लवकरात लवकर उपाय काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

शहरातील वाढत चाललेल्या हिट अँड रन प्रकरणांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षितता राखावी अशी विनंती देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment