Hingoli Lok Sabha : हिंगोली महायुतीत मिठाचा खडा! शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा विरोध, नेमकं कारण काय?

Hingoli Lok Sabha : राज्यात महायुतीत अनेक ठिकाणी जागांचा तिढा निर्माण (Hingoli Lok Sabha) झाला आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून याबाबत अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात घेतला जाईल, असे महायुतीचे नेते सांगत असले तरी परिस्थिती तशी दिसत नाही. धुसफूस वाढू लागली आहे. स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विरोधात असल्याचेही दिसून येत आहे. असाच प्रकार आता मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli Lok Sabha Constituency) घडला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच (Hemant Patil) पुन्हा तिकीट दिले आहे. परंतु, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात नाराजी उफाळून आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार शिवाजी माने यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उमेदवारी विरोध केला आहे. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही उमेदवार बदला, अशी मागणी माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महायुतीत सारे काही आलबेल आहे अशी परिस्थिती नाही, हे स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे येथे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी देऊ नका असे आम्ही वारंवार सांगितले होते परंतु तरीदेखील आमच्यावर उमेदवारी लादली केली आहे. हेमंत पाटील यांना मतदारांशी काहीच देणे घेणे नाही. त्यांचा विश्वास पक्षप्रमुखांवर आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली आहे असे माजी खासदार माने म्हणाले.

Lok Sabha Elections : शिवसेना विरुद्ध शिवसेना! ‘या’ 5 मतदारसंघात शिंदे अन् ठाकरेंचे शिलेदार आमनेसामने

Hingoli Lok Sabha

हेमंत पाटील यांना फोन केला तरी देखील ते फोन घेत नाहीत. बऱ्याचदा त्यांचा फोन बंद असतो, असा अनुभव आम्हाला आलेला आहे. मतदारसंघातील लोकांना देखील हा अनुभव आहे. वैयक्तिक हेमंत पाटील आमचे मित्र आहेत. जिल्हाप्रमुख पदापासून आतापर्यंत आम्ही त्यांना मदत केली आहे मला उमेदवारी मिळत नाही म्हणून मी त्यांच्यावर टीका करतोय अशातला भाग नाही. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे परंतु शिवसेनेने हेमंत पाटील यांच्याऐवजी असा उमेदवार दिला पाहिजे की तुम्हाला लोकांमध्ये जाता येईल, असे माने म्हणाले.

यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतही हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. हिंगोली भाजप पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीत आमदार नामदेव ससाणे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार भीमराव केराम आदी उपस्थित होते. या सर्वांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे सांगितले जात आहे.

हिंगोली मतदार संघात उमेदवार बदलून देण्यात यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसतील तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगावे. आम्ही ही जागा निवडून आणू असा ठराव या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

Hingoli Lok Sabha

Lok Sabha Election : अखेर, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, जाणून घ्या कोणाच्या खात्यात कोणती जागा ?

वेळ पडल्यास भारतीय जनता पार्टीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढेल पण हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करा, अशी मागणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी या बैठकीत केली. हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या घडामोडीनंतर हिंगोली मतदारसंघात उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे.

शिंदे गटाने हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता त्यांची उमेदवारी मागे घेण्याचा प्रश्न बहुदा येत नाही. अशा परिस्थितीत मतदारसंघात निर्माण झालेला हा वाद महायुतीचे वरिष्ठ नेते कशा पद्धतीने हाताळतात आणि यातून कोणता मार्ग काढला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2 thoughts on “Hingoli Lok Sabha : हिंगोली महायुतीत मिठाचा खडा! शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा विरोध, नेमकं कारण काय?”

Leave a Comment