Rain : शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसात फारसा पाऊस पडलेला नाही. याआधी सोमवारी मात्र ठिकठिकाणी पाऊस झाला होता. जिल्ह्यात आता 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. सखल परिसरात राहणार्‍या लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे. नदीकाठच्या नागरिकांना सावध रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, ओढे व नाल्यांपासून दूर रहावे. जुनाट व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रात पर्यटनासाठी जाणार्‍या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत जवळचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राधिकरणाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) मागील सात ते आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. नगर शहराला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शहरात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. नालेसफाईचे काम व्यवस्थित न झाल्याने पाणी वाहते होत नाही. पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. अपघाताचा धोकाही वाढला आहे. वाहनचालकांनाही पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास वाढला आहे. हवामानात बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप, थंडी या व्हायरल आजारांनी थैमान घातले आहे. शहरातील दवाखाने फुल्ल झाले आहेत. सध्या प्रत्येक घरात या व्हायरल आजारांचे पेशंट आहेत.

Share.

Leave A Reply

Exit mobile version