मुंबई : मार्च महिना सुरू झाला तसा उन्हाळाही जाणवायला लागला आहे. दिवसाच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. राज्यातील काही ठिकाणी उष्णतेत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोवा, कोकण किनारी परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्रात 17 मार्चनंतर कडाक्याचा उन्हाळा जाणवेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
पुढील दोन दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह इतर उपनगरांतही तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान वाढल्यास मार्च महिन्यात मुंबईकरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईसह, पालघर (Palghar), ठाणे जिल्ह्यातही तापमान 42 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे काळजी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. आता कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे या दिवसात घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, या काळात आरोग्याकडे लक्ष देणेही जास्त महत्वाचे आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा उन्हाळा कसा असेल याबाबत निश्चित अंदाज नाही. मात्र, बदलत्या हवामानाचा परिणाम जाणवू शकतो. कारण, काही दिवसांपासून हवामानात अनपेक्षित बदल होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे.
जगभरातही सध्या अनेक नैसर्गिक संकटे येत आहेत. कुठे प्रचंड पाऊस तर कुठे भीषण दुष्काळ अशी संकटे येत आहेत. मागील वर्षात अनेक ठिकाणी चक्रीवादळांचाही फटका बसला होता. या बदलत्या हवामानाचा त्रास अवघ्या जगालाच सहन करावा लागत आहे.
या भागाला दुष्काळाचा धोका, उन्हाळाही लांबणार, ‘आयपीसीसी’चा धक्कादायक निष्कर्ष…