अहमदनगर : एचआयव्ही (एड्स) या घातक आजारास प्रतिबंध करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमांमुळे ‘एचआयव्ही’चे प्रमाण घटल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. 2022 या वर्षात जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण आता अर्धा टक्क्यापेक्षाही कमी झाले आहे. यावर्षात फक्त 419 एचआयव्ही बाधित रुग्ण सापडले आहेत. याआधी 2019 या वर्षात 0.5 टक्के प्रमाण होते. त्यानंतर पुढील 2020 व 2021 या दोन्ही वर्षात 0.3 टक्के प्रमाण राहिले.
डिसेंबर महिन्यात जागतिक एड्स दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या व्यतिरिक्त वर्षभरात जनजागृती उपक्रम नियमितपणे सुरू असतात. जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांत येणार्या रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात येते. या आजाराबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे आजार रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. मागील चार ते पाच वर्षात आजाराचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. सन 2015 मध्ये एकूण 99,845 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1169 रुग्ण एचआयव्ही संसर्गित आढळले. या वर्षात एचआयव्ही संसर्गितांचे प्रमाण 1.2 टक्के होते.
त्यानंतर 2016 या वर्षात 1,08,601 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 900 (0.8 टक्के) संसर्गित आढळले. 2017 मध्ये 1 लाख 12 हजार 77 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 907 (0.8 टक्के) संसर्गित आढळले. 2018 मध्ये 1,18,944 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 846 (0.7 टक्के) संसर्गित आढळले. 2019 मध्ये 743, 2020 मध्ये 474, 2021 मध्ये 393 तर 2022 मध्ये आतापर्यंत 1 लाख 20 हजार 538 रुग्णांची तपासणी केली असून यापैकी 419 (0.3 टक्के) जण एचआयव्ही बाधित आढळले आहेत. सन 2002 मध्ये एचआयव्हीचे प्रमाण 31.2 टक्के होते. आता मात्र हा घातक आजार आटोक्यात आल्याचे सांगण्यात आले.
राज्यात एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नगर शहरातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. पथनाट्य, पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून या जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. व्याख्याने, पथनाट्य, विविध स्पर्धा आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणार आहेत. नागरिकांनीही एचआयव्ही तपासणी करावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
- वाचा : नवीन अभ्यासानुसार कोविड-19 चे पुढील प्रकार ओमिक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक असू शकतात; जाणून घ्या याविषयी सविस्तर
- कोरोना कधी संपणार..? ; पहा, WHO च्या वैज्ञानिकांनी काय दिलीय महत्वाची माहिती..?