Health Insurance : देशात बिगर-जीवन विमा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. विमा नियामक इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने जाहीर केलेल्या ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार, देशातील नॉन-लाइफ इन्शुरन्स प्रीमियम (Non Life Insurance Premium ) वार्षिक 12 टक्क्यांनी वाढून 24 हजार 471 कोटी रुपये झाला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत देशातील 31 नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपन्यांनी एकूण 21,867 कोटी रुपयांचा प्रीमियम (Premium) गोळा केला होता. IRDAI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 सामान्य विमा कंपन्यांनी गोळा केलेल्या प्रीमियममध्ये ऑगस्टमध्ये 9.3 टक्के वाढ झाली आहे. ते या वर्षी ऑगस्टमध्ये 17,101 कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे आधीच्या याच कालावधीत 15,648 कोटी रुपये होते.
देशातील पाच स्वतंत्र आरोग्य कंपन्यांच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ते 1609 कोटी रुपयांवरून यावर्षी ऑगस्टमध्ये वाढून 2059 कोटी रुपये झाले आहे. देशातील सरकारी बिगर आयुर्विमा कंपन्यांनाही मोठा फायदा झाला आहे. या कंपन्यांच्या विमा प्रीमियममध्ये 15.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये हे वाढून 5,310 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 4,609 कोटी रुपये होते. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत देशातील 31 विमा कंपन्यांचा एकूण प्रीमियम 18.57 टक्क्यांनी वाढून 1,02,357 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 86,329 कोटी रुपये होता.
सध्या आरोग्य विमा घेण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे कोरोना काळात लोकांना आरोग्याचे महत्व समजले. या काळात लोकांचे हाल झाले. पैशांअभावी औषधोपचारात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे भविष्यातील संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने लोकांनी आता आरोग्य विमा (Health Insurance) घेणे महत्वाचे मानले आहे.