धक्कादायक..! जगातील 50 पैकी 35 प्रदूषित शहरे भारतात; दिल्लीनेही केलेय ‘हे’ मोठे रेकॉर्ड; जाणून घ्या..
दिल्ली : वायू प्रदूषणाची (Air Pollution) समस्या फक्त भारतात नाही तर अवघ्या जगासाठीच त्रासदायक ठरत आहे. जगात अनेक देशांत वायू प्रदूषण अतिशय वेगाने वाढत चालले आहे. या संकटामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या भारतातील काही शहरात या समस्येने विक्राळ रुप धारण केले आहे. राजधानी दिल्ली शहरात तर हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाली आहे. दिल्ली शहर सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर (Polluted City) ठरले आहे. इतकेच नाही तर जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 35 शहरे ही भारतीय शहरे आहेत.
IQAIR च्या ताज्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2021 च्या जागतिक वायु गुणवत्ता अहवालात नवी दिल्ली हे सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर आणि चौथे सर्वात प्रदूषित शहर म्हणून वैशिष्ट्यीकृत केले आहे. त्यानंतर बांगलादेशातील ढाका, चाडमधील एन’जामेना, ताजिकिस्तानमधील दुशान्बे आणि ओमानमधील मस्कत यांचा क्रमांक आहे. नवी दिल्लीमध्ये 2021 मध्ये PM2.5 मध्ये 14.6% वाढ झाली आहे.
सर्वाधिक प्रदूषित 50 पैकी तब्बल 35 शहरे भारतात आहेत, तर भारताची वार्षिक सरासरी PM2.5 पातळी 2021 मध्ये 58.1 µg/m3 वर पोहोचली. ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारण्याचे तीन वर्षांचे प्रयत्न अयशस्वी झाले. भारताची वार्षिक PM2.5 सरासरी आता 2019 मध्ये मोजलेल्या आधीच्या पातळीवर परत आली आहे.
ग्रीनपीस संघटनेचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल म्हणाले, की हा अहवाल सरकार आणि कॉर्पोरेशनसाठी महत्वाचा आहे. लोक धोकादायक प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरी पीएम 2.5 पातळीमध्ये वाहन प्रदूषणाचा मोठा वाटा आहे. देशात वार्षिक वाहन विक्री वाढणे अपेक्षित असताना, वेळेत सुधारात्मक उपाययोजना न केल्यास त्याचा निश्चितपणे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.
वायू प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. चांगली बातमी अशी आहे की वायू प्रदूषणाच्या संकटावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला विज्ञानात गुंतवणूक करण्याची गरज नाही. आम्हाला उपाय माहित आहे आणि ते सहज उपलब्ध आहे. इंधन जाळल्यामुळे होणारे वायू प्रदूषण हे हवामान संकटात मोठे योगदान देते. सरकारांनी वाहतुकीसाठी अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याची तसेच सायकल, सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याची वेळ आली आहे.
भारीच.. तर ‘अशा’ पद्धतीने वायू प्रदूषण होणार कंट्रोल; पहा, ‘प्रदूषण नियंत्रण’ चा काय आहे प्लान..?