Corona Update : मागील 24 तासांत देशभरात सापडलेत फक्त ‘इतके’ रुग्ण.. जाणून घ्या, कोरोना अपडेट
दिल्ली : देशात दररोज आढळणाऱ्या कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या आता वेगाने कमी होत आहे. मागील 24 तासात तर देशभरात 15 हजारांपेक्षाही कमी रुग्ण सापडले आहेत. देशात 49 दिवसांनंतर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही दोन लाखांहून कमी झाली आहे. दैनंदिन संसर्ग दराबरोबरच साप्ताहिक संसर्ग दरही दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13,405 नवीन रुग्ण आढळून आले असून 235 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 128 मृत्यू एकट्या केरळमधील आहेत जेथे नवीन आकडेवारीसह आधीचे मृत्यू जाहीर केले जात आहेत.
एकूण रुग्णांची संख्या 4.28 कोटींवर पोहोचली असून मृत्यूंची संख्या 5.12 लाख झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये 21,056 ने घट झाली आहे आणि सध्या त्यांची संख्या 1,81,075 वर आली आहे. जी एकूण प्रकरणांच्या 0.42 टक्के आहे. दैनंदिन संसर्ग दर 1.24 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 1.98 टक्के आहे. त्याच वेळी, रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.38 टक्के आणि मृत्यू दर 1.20 टक्के झाला आहे.
कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात 77.88 कोटी लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे, म्हणजेच त्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 176 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 96.37 कोटी प्रथम आणि 1.82 कोटी दक्षता डोसचा समावेश आहे. गेल्या 24 तासात 35.50 लाख डोस देण्यात आले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 11.17 कोटी डोस शिल्लक आहेत.
दरम्यान, देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी जगभरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. अनेक देशात या घातक आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे या देशांतील परिस्थिती दिवसेंदिवस आधिकच खराब होत आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन आल्यानंतर, जगभरात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
आतापर्यंत जगभरात 42.13 कोटींहून अधिक लोक कोविड-19 च्या विळख्यात आले आहेत. तर कोट्यावधी लोक बरे सुद्धा झाले आहेत. त्याच वेळी, या आजारामुळे आतापर्यंत 58.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासा देणारी बातमी अशी आहे की, आतापर्यंत जगभरात 10.31 अब्ज लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले गेले आहे.
अर्र.. आता कशी करणार कोरोनाची चौकशी..? ; पहा, चीनने काय केलाय नवा कारनामा..?