Corona Update : कोरोनाचे रुग्ण कमी होताहेत पण, ‘त्यामुळे’ वाढलेय टेन्शन; जाणून घ्या, अपडेट
मुंबई : देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तथापि, मृत्यूंची वाढती संख्या आरोग्य तज्ज्ञांसाठी काळजीचा मुद्दा ठरला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 1192 मृत्यूची नोंद झाली आहे. तर सोमवारी 959 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवडाभरापासून ही संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, मंगळवारी देशात 1,67,059 नवीन रुग्णांची नोंद झाली, जी सोमवारच्या तुलनेत 42 हजारांनी कमी आहे. सोमवारी 2.09 लाख (2,09,918) रुग्ण आढळले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशातील 2.54 लाख (2,54,076) लोक कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यानंतर आता देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 17,43,059 झाली आहे. त्याच वेळी, एकूण मृत्यूंची संख्या 4,96,242 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आतापर्यंत 4,14,69,499 लोकांना कोरोना संक्रमित झाले आहेत, तर 3,92,30,198 लोक बरेही झाले आहेत. दैनिक पॉजिटिविटी दर 11.69% पर्यंत खाली आला आहे.
ICMR नुसार, देशात आतापर्यंत 73,06,97,193 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी 14,28,672 लोकांची तपासणी करण्यात आली. त्याच वेळी, एकूण लसीकरण 1,66,68,48,204 वर पोहोचले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 25 जानेवारीपासून आतापर्यंत 6392 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या एका आठवड्यातील आकडेवारी पाहिल्यास, कोरोनामुळे मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. 25 जानेवारी रोजी 614 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, जो 1 फेब्रुवारीला वाढ होऊन 1192 झाला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 166.03 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. त्याच वेळी, कोरोना तपासण्यांचा वेग मात्र कमी होताना दिसत आहे. आरोग्यमंत्र्यांनीही या महत्वाच्या मुद्द्याकडे राज्यांचे अनेक वेळा लक्ष वेधले आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. कोरोना रुग्ण कमी आढळण्याचे हे ही एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 72.89 कोटींहून अधिक कोविड चाचण्या झाल्या आहेत.