नवी दिल्ली : देशभरात आता कोरोनाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचे टेन्शन वाढले आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. देशात काही राज्य आणि जिल्हे असे आहेत की ज्यामुळे कोरोना अतिशय वेगाने फैलावत आहे. देशात 300 जिल्हे असे आहेत की जेथे दर आठवड्याचा संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांत कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. कोरोनाच्या संसर्गात 30 डिसेंबर रोजी 1.1 टक्के वाढ झाली होती. त्याचप्रमाणे काल बुधवारी मात्र हे प्रमाण 11.05 टक्क्यांवर पोहोचले आहे.
देशात कोरोनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे पात्र लोकांनी प्राधान्याने लस घेतली पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग म्हणजे साधा ताप किंवा खोकला नाही, त्यामुळे याकडे आधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्यावेत, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
देशात काल कोरोना संसर्गाची 1,94,720 नवीन प्रकरणे आल्यानंतर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,60,70,510 झाली आहे. त्यापैकी 4,868 प्रकरणे ओमिक्रॉन प्रकारातील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 9,55,319 आहे, जी गेल्या 211 दिवसांतील सर्वाधिक आहे.
दरम्यान, जगभरातील अनेक देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. सध्या अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, इटली या देशात अतिशय वेगाने रुग्णवाढ होत आहे. अमेरिकेत तर रोजच रेकॉर्ड ब्रेक संख्येने रुग्ण आढळत आहेत. एका दिवसात 13 लाखांपेक्षा रुग्ण येथे सापडत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेवरील ताण अत्यंत वाढला आहे. कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, मात्र त्यामुळे फारसा फरक पडत नसल्याचे दिसत आहे.
आजही कोरोना वेगात.. देशभरात सापडलेत ‘इतके’ नवीन कोरोना रुग्ण; जाणून घ्या, काय आहे परिस्थिती