Corona Update : आजही राज्यात कोरोना सुस्साट.. ‘इतके’ नवे रुग्ण सापडले; पहा, देशात काय आहे परिस्थिती ?
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत चालली आहे. नव्या वर्षात कोरोना पुन्हा त्रास देत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. आजही राज्यात कालच्या तुलनेत जास्त रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची ही वाढती आकडेवारी निश्चितच काळजीत टाकणारी आहे. राज्यात आज दिवसभरात ३६ हजारांहून अधिक तर राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आज एकाच दिवसात ओमिक्रॉन प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी भारतात एकाच दिवसात ओमिक्रॉन प्रकाराची सर्वाधिक 495 प्रकरणे नोंदवली गेली. देशात नवीन प्रकाराची एकूण प्रकरणे 2,630 वर गेली आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे एकूण 90 हजार 928 रुग्ण आढळले असून 325 जणांचा मृत्यू झाला आहे. एक दिवस आधी ५८ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली होती.
आज महाराष्ट्रात कोरोनाचे 36,265 नवे रुग्ण आढळले आहेत. 8,907 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज ओमिक्रॉनचे 79 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात एकूण 876 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 381 बरे झाले आहेत. देशात ओमिक्रॉन प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे राज्यात आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी 800 मेट्रिक टन दिवसापेक्षा जास्त झाल्यास लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्याचा विचार करणार असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी सांगितले. रुग्णालयातील 40 टक्क्यांहून अधिक खाटा कोरोना रुग्णांनी भरल्या गेल्यास लॉकडाऊन निर्बंधांचा विचार केला जाईल.
मुंबईत आज कोविडचे 20,181 नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पॉजिटिविटी रेट 29.90 टक्के आहे. 67 हजार नमुन्यांपैकी 20,181 नमुने पॉजिटिव आले आहेत.
दिल्लीत कोरोना संसर्गाची 15 हजार 97 प्रकरणे आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉजिटिविटी रेट 15.34 टक्क्यांवर गेला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी माहिती दिली होती की, गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत कोरोनाचे 14 हजार प्रकरणे समोर येऊ शकतात. एका दिवसाआधी येथे 10,665 नवीन प्रकरणे नोंदवली गेली.
हरियाणामध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. गुरुवारी राज्यात 2678 बाधित आढळले असून त्यात ओमिक्रॉनच्या आठ नवीन रुग्णांचा समावेश आहे. या दरम्यान 801 बाधित रुग्ण बरेही झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात Omicron चे 114 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 83 रुग्ण बरे झाले आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये 498 नवीन कोविड प्रकरणे आढळली आहेत आणि 60 बरे झाले आहेत. गुजरातमध्ये 4,213 नवीन रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 6,983 नवीन रुग्ण आढळले आहेत. 721 रुग्ण बरे झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 630 नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी ही माहिती दिली. आतापर्यंत एकूण 3,47,098 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.