.. तर हॉटेलमध्ये सुरू होतील कोविड केअर सेंटर; पहा, केंद्राने नेमके काय म्हटलेय ‘त्या’ पत्रात
मुंबई : कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालयाने एक पत्र लिहून राज्यांना सतर्क केले आहे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ करण्यास सांगितले आहे. सौम्य आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी केंद्राने राज्यांना हॉटेल रूम कोविड केअर सेंटर म्हणून विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी राज्यांना पत्र लिहून हॉटेलच्या खोल्यांमध्ये कोविड केअर सेंटर्स विकसित करण्यास सांगितले आहे. याशिवाय, कोरोनाची प्रकरणे अचानक वाढल्यास कोणत्याही स्टॉकची कमतरता टाळण्यासाठी चाचणी किट (आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचणी दोन्हीसाठी) सारख्या लॉजिस्टिक पुरवठा पूर्णपणे राखला गेला पाहिजे. आरोग्य पायाभूत सुविधा वेगाने वाढ करण्यास सांगितले गेले आहे. केंद्राने राज्यांना सांगितले आहे, की रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण व्यवस्था करावी. खाटांची कमतरता भासू नये, तात्पुरते रुग्णालय आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा यामध्ये वाढ करण्यावर लक्ष केंद्रीत करावे.
देशात कोरोना व्हायरस आणि त्याचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात रुग्ण वेगाने वाढत चालले आहेत. तसेच अन्य राज्यांतही कोरोनाने आता वेग घेतला आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये निर्बंध पुन्हा कठोर केले जात आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले होते की, आम्ही देशातील सर्व राज्यांमधील सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधा आणि तयारीचा सातत्याने आढावा घेत आहोत.
केंद्रीय आरोग्य मंत्री पुढे म्हणाले, की 15-18 वयोगटातील लसीकरण कालपासून सुरू झाले. सोमवारी या वयोगटातील 40 लाखांहून अधिक युवकांना लसीकरण करण्यात आले. आजही जवळपास तितक्याच संख्येने लसीकरण होण्याची शक्यता आहे. आम्ही सर्व राज्यांसह आरोग्य पायाभूत सुविधांचा सातत्याने आढावा घेत आहोत आणि त्यानुसार तयारी करत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. मांडविया यांनी सांगितले होते.