नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषण हा एक मोठा धोका म्हणून समोर आला आहे. वेगाने वाढणारी वाहनांमुळे शहरांतील प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. आज तर राजधानी दिल्ली शहरात श्वास घेणे सुद्धा कठीण झाले आहे. या शहरात वायू प्रदूषण प्रचंड वाढले आहे. जगातील अन्य देशांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. भारता शेजारील चीन आणि पाकिस्तान या देशांतही वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड ढासळली आहे. आज थोडी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले मात्र, अजूनही अतिशय वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, रविवारी राजधानीत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) इंडियाच्या मते, दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत थोडी सुधारणा झाली आणि एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 398 वर पोहोचला. त्याच वेळी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, AQI 401 नोंदवला गेला, जो देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 402 AQI सह फरीदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे.
याआधी शुक्रवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीत होती. ज्या दरम्यान AQI 432 वर पोहोचला होता. 21 डिसेंबरपासून राजधानीतील तापमानात घट नोंदवली जात आहे. यासोबत थंडीची लाटही सुरू आहे, मात्र वायू प्रदूषणाची पातळीही गंभीर राहिली आहे. परिस्थिती अशी आहे की, सकाळी आणि विशेषतः संध्याकाळी राजधानीत प्रदूषण स्पष्टपणे दिसून येत होते.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वायू प्रदूषणाबाबत धक्कादायक खुलासा केला होता. या अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे जगात प्रत्येक मिनिटाला 13 लोकांचा मृत्यू होत आहे. ग्लासगो येथे सुरू असलेल्या जलवायू परिवर्तन संमेलनात आरोग्य संघटनेने हा अहवाल जाहीर केला. तसेच या समस्येबाबत एक गंभीर इशाराही दिला आहे. त्यामुळे आता परिस्थिती आधिक खराब होणार नाही, आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल, यादृष्टीने काम करणे गरजेचे ठरणार आहे.
या संमेलनाआधी आयोजित बैठकीत संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले होते, की ग्लोबल वॉर्मिंगला 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवण्यासाठी जगातील सर्व देशांनी कार्यवाही करावी. या दृष्टीने प्रयत्न करणे सर्वांच्याच हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. जलवायू परिवर्तन आजमितीस आरोग्यापुढील सर्वात मोठे संकट ठरले आहे.
बाब्बो.. दिल्ली नाही तर हे शहर ठरलयं सर्वात प्रदूषित; पहा, कसे वाढलेय प्रदूषण..?