Take a fresh look at your lifestyle.

ओमिक्रॉनचे संकट : राज्यात पुन्हा निर्बंधाची शक्यता.. आज लागू होणार नव्या गाइडलाइन्स

मुंबई : ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. त्यात नाइट कर्फ्यू तसेच स्थानिक पातळीवर गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले जावेत, अशाप्रकारचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने लगेचच निर्णय घेत राज्यात नाइट कर्फ्यू लावला आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री १० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्ससोबत तातडीची बैठक घेतली.

Advertisement

या बैठकीत ओमिक्रॉनची सद्यस्थिती लक्षात घेत व्यापक चर्चा करण्यात आली. त्याचवेळी गर्दी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे निर्बंध लावता येतील, राज्यात नाइट कर्फ्यू लावण्याची गरज आहे का, ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अन्य कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मते जाणून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारीच राज्यात नव्याने गाइडलाइन्स जारी करण्याचे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Advertisement

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ८८ रुग्ण आढळले आहेत. त्याने महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं असून याबाबत तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. देशातील अन्य राज्यांमधील स्थिती, तेथे लावण्यात आलेले निर्बंध याबाबतचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतला.

Advertisement

यूरोपमधील ब्रिटन व अन्य देशांत कोविड स्थिती भीषण आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्रात कोणती पावले उचलली जावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मतेही विचारात घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या असून बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Advertisement

नाताळ सण, नववर्षाचे सेलिब्रेशन या गोष्टी लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली व याबाबत शुक्रवारी (२४ डिसेंबर) नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply