पुणे : आज महाराष्ट्रात राज्यभर भाजपने ओबीसींना राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर गावोगावी व मोठ्या शहरात आंदोलन केले आहे. मात्र, करोनाचा डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंट्समुळे ४ ते ६ आठवड्यांत तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने या आंदोलनाद्वारे गर्दी करण्याचा इतका अट्टाहास का केला, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण मास्क आणि दोघांमधील अंतर हे नियम पायदळी तुडवून आज महाराष्ट्रात लाखो लोक यानिमित्ताने एकत्र आलेले आहेत.
मराठा आरक्षण मुद्द्यावर सगळ्यांनी समंजसपणा दाखवला. भाजपने त्यावेळी आपले झेंडे म्यान करून ‘सहकार्य’ही केले. पण आजच्या आंदोलनातून राज्यातील आरोग्याचा प्रश्न पुन्हा पुढे आल्यास त्याला जबाबदार कोण राहील असाच प्रश्न विचारला जात आहे. मुंबईतील धीरेश गोहिल यांनी यावर म्हटले आहे की, आज राज्यभर बीजेपी नेते चक्का जाम आंदोलन करत आहेत. पण कोणालाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती नाही. उलट कोरोना वाढून राज्य सरकारची कोंडी व्हावी हीच इच्छा दिसते. अशा बीजेपीला आता जनतेनेच धडा शिकवावा. भले ही एकांगी वाटणारी किंवा एखादी प्रतिक्रिया वाटत असेल. मात्र, करोनाच्या संकटात असे आंदोलन टाळणे आणि न्यायालयीन लढाई लढणे हाच एकमेव मुद्दा भाजपने लक्षात ठेवण्याची गरज स्पष्ट आहेच की..!
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर आज भाजप कार्यकर्ते राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करीत असल्याचे महाराष्ट्र भाजपने म्हटलेले आहे. दरम्यान, प्रस्तावित पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे न घेतल्यास भाजप प्रत्येक जागेवर केवळ ओबीसी चेहरा उभा करेल अशी घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. मात्र, राज्यातील सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात घालून केलेल्या या आंदोलनामुळे काही संकट आले तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हाही प्रश्न कायम आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.