अहमदाबाद : जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. हा विषाणू नेमका कुठून आला, कसा तयार झाला याचे ठोस उत्तर अजूनही मिळालेले नाही. मात्र, आता या विषाणून जग व्यापून टाकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत आपण कोरोना विषाणू सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनमध्ये आढळल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. आता मात्र आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क नदीच्या पाण्यात कोरोना विषाणू पसरल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील साबरमती नदीच्या पाण्यात कोरोना विषाणू आढळला आहे. या नदीतील विविध ठिकाणचे नमुने गोळा करुन तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. साबरमतीसह कांगरिया, चांदोला तलावाच्या पाण्यात सुद्धा हा घातक विषाणू आढळला आहे. या नंतर शास्त्रज्ञांनी आसाम राज्यातील भारू नदीतील पाण्याची तपासणी केली असता या पाण्याच्या नमुन्यातही कोरोना आढळून आला आहे. नदीच्या पाण्यात कोरोना सापडल्याने नागरिकांतही भितीचे वातावरण आहे.
नद्यांच्या पाण्यामध्ये कोरोना आहे, का याचा शोध घेण्याच्या उद्देशाने आयआयटी गांधीनगर आणि देशातील आठ संस्थांनी अभ्यास केला. पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली. त्यात असे दिसून आले की या पाण्याच्या नमुन्यात खूप जास्त प्रमाणात कोरोना विषाणू असल्याचे दिसून आले. गांधीनगर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पृथ्वी विभागाचे प्रमुख मनीष कुमार यांनी सांगितले, की याआधी फक्त सीवेज लाइनमध्येच कोरोना विषाणू आढळले होते. मात्र, नदीच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये विषाणू आढळले आहेत. विशेष म्हणजे, अहमदाबाद मध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रकल्प आहेत. मात्र, गुवाहाटीमध्ये असा प्रकल्प नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले होते. या दोन्ही ठिकाणच्या पाण्याचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याआधी असा प्रकार आढळला नव्हता. आता मात्र नदीच्या पाण्यातही हा विषाणू जिवंत राहू शकत असल्याचे याद्वारे सिद्ध झाले आहे. हा घातक विषाणू माणसांत तर पसरला आहेच. पाळीव प्राणी आणि वन्यप्राण्यांनाही विळख्यात घेत आहे. त्यानंतर आता नदीच्या पाण्यात सुद्धा विषाणूने घर केले आहे. अशा पद्धतीने हा विषाणू फारच त्रासदायक ठरू लागला आहे. देशात आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विषाणूचा धोका अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.