कोल्हापूर : गावातला ग्रामपंचायत शिपाई म्हणजे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्था यांच्यातला खरा दुवा. मात्र, हाच शिपाई जर अवलिया असेल तर या तिघांचेही काही खरे नाही. मग, तिघांनाही झटका बसला म्हणूनच समजा. तसलाच अवलिया शिपाई भेटलेल्या एका गावाला मोठा हिसका बसला आहे. त्यामुळे गावानेही त्याचा मोठाच धसका घेतला आहे.
ही घटना घडली आहे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील सरताळे गावातील. ब्लीचिंग पावडरचे अख्खे पोते एका विहिरीत टाकल्यामुळे गावकऱ्यांना परसाकडे धाव घ्यावी लागण्याची ही घटना सध्या चर्चेत आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायाने मद्यधुंद अवस्थेत हा उद्योग केला आहे. परिणामी जुलाब, उलट्यांचा त्रास झाल्याने ५० गावकऱ्यांना वाई,पाचवड येथील रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांनी सांगितले आहे.
मद्यधुंद अवस्थेत गावातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीत ब्लिचिंग पावडरचे अख्खे पोते टाकून देण्याचा प्रताप केलेल्या शिपायावर आता कारवाई करणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्याने सांगितले आहे. अख्खे पोते कमी म्हणून की काय बुधवारी सकाळी पुन्हा उरलीसुरली पावडरही त्याने टाकली होती. एकीकडे गावकऱ्यांची परसाकडे पळापळ सुरु झाली तर दुसरीकडे आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी केली असता दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले असून हा पराक्रम शिपायाच्या नावावर असल्याचे म्हटले जात आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.