Hawaii wildfires : अमेरिकेच्या मध्यभागी असलेल्या हवाईच्या माउ बेटावरील जंगलात लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. लाहैना शहर मोठ्या प्रमाणात लागलेल्या वणव्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शहरातील 1000 हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत.
हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन म्हणाले की, विध्वंसानंतर 1.6 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या लाहैना शहराची पुनर्बांधणी करण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी रुपये लागतील. राज्यपालांच्या म्हणण्यानुसार, ‘1961 मध्ये समुद्राच्या लाटेत 61 लोकांचा मृत्यू झाल्यापासून ही सर्वात मोठी आपत्ती आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी ही आपत्ती घोषित केली आणि मदत कार्यासाठी निधी जारी केला. 14,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
80 टक्के आग आटोक्यात
लाहैना परिसरातील आग 80 टक्के आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात गेल्या 24 तासांपासून वीज नसल्याने सुमारे 11 हजार नागरिक अंधारात जगत आहेत. यूएस कोस्ट गार्डचे कमांडर एजा किरक्स्के यांनी सांगितले की, 100 हून अधिक लोकांनी जीव वाचवण्याच्या प्रयत्नात समुद्रात उडी मारल्याची भीती आहे. आगीतून धुराचे लोट उठत असल्याने हेलिकॉप्टरच्या पायलटला बचाव कार्यात अडचण येत आहे. असे असतानाही एका तटरक्षक दलाने ५० हून अधिक लोकांना वाचवले आहे.