नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी लढत तिरंगी दिसत आहे. येथील सत्ता वाचविण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि आम आदमी पक्षही मोठे दावे करत आहेत. यावेळी गुजरातमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार, हे 8 डिसेंबरला कळेल. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान होणार आहे.
गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन करणे आवश्यक आहे. 182 आमदार असलेल्या गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी 89 जागांवर मतदान होणार असून, त्यात 788 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे.
गुजरातमधील मतदानाचा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या काळात अशा अनेक जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे, ज्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा कल बदलू शकतो. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोटाड, नर्मदा, भरूच, सूरत, तापी, नवसारी, वलसाड जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 4 कोटी 91 लाख 17 हजार 308 लोक मतदान यादीत आहेत. यातील बहुतांश तरुण मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण 51,782 मतदान केंद्रे करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीअंतर्गत 142 मॉडेल मतदान केंद्रेही उभारण्यात येणार आहेत. याशिवाय दिव्यांगांसाठीही योग्य सोय केली जाईल, असे आयोगाने सांगितले आहे.
भाजपने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या पक्षाकडून यसुदन गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव जाहीर केलेले नाही. गुजरातमध्ये गेल्या सहा विधानसभा निवडणुकीत भाजपला कोणीही हादरा देऊ शकलेले नाही. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. टक्केवारीनुसार त्या निवडणुकीत भाजपला 49.05 टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला 42.97 टक्के मते मिळाली.
- हे पण वाचा : गुजरातचे राजकारण तापले..! भाजपने ‘त्यामध्ये’ पुन्हा घेतली आघाडी; पहा, आप-काँग्रेसचा काय आहे प्लान ?
- ‘त्यामुळे’ भाजपने केली मोठी कारवाई; निवडणुकीआधी ‘इतक्या’ उमेदवारांना केले निलंबित; जाणून घ्या..