नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या बंडखोर नेत्यांवर जोरदार कारवाई केली आहे. भाजपने सहा वेळा आमदार मधू श्रीवास्तव आणि दोन माजी आमदारांसह 12 पक्ष नेत्यांना निलंबित केले. विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
1 डिसेंबरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्याबद्दल सात भाजप नेत्यांना निलंबित करण्यात आल्याच्या काही दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य भाजप युनिटने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढणाऱ्या आणखी 12 नेत्यांना गुजरात भाजप अध्यक्ष सी. आर. पाटील यांनी निलंबित केले आहे.
विशेष म्हणजे, दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 93 जागांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर होती. मात्र एकाही बंडखोराने नाव मागे घेतले नाही. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई झाली. हे नेते आता उत्तर आणि मध्य गुजरातमधील 11 जागांवर भाजप उमेदवारांविरुद्ध लढणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी पार्टीच्या अडचणी वाढणार आहेत.
या नेत्यांमध्ये वाघोडिया (वडोदरा जिल्हा) येथील विद्यमान आमदार मधु श्रीवास्तव यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार दिनू पटेल आणि माजी आमदार धवलसिंग झाला यांचा समावेश असलेल्या 12 जणांना पक्षाने कारवाई केली आहे. अन्य नेत्यांमध्ये कुलदीपसिंह राऊळ (सावळी), खातुभाई पागी (शेहरा), एसएम खंत, जेपी पटेल, रमेश झाला (उमरेठ), अमरशी झाला (खंभात), रामसिंह ठाकोर (खेरालू), मावजी देसाई (धनेरा) यांचा समावेश आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपने यावेळी दीडशेहून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोर नेत्यांनी पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी नाराज नेत्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. असे असतानाही अनेक नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल केले.
यावेळी भाजपने माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह एकूण 42 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. भाजपने यावेळी 16 महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपने पहिल्या यादीत 14 तर दुसऱ्या यादीत दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला राज्यातील 89 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
- हे वाचा : काँग्रेसने घेतला मोठा निर्णय; गुजरात निवडणुकीसाठी ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी; जाणून घ्या..
- Gujarat Election जोरात..! आप-काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाजपने केला ‘हा’ प्लान; जाणून घ्या..