Gratuity Amount : जर एखादा कर्मचारी एकाच कंपनीत 5 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर नियमांनुसार कंपनीच्यावतीने त्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी (Gratuity Amount) दिली जाते. परंतु, अनेक वेळा कंपन्या ग्रॅच्युइटी देण्यास नकार देत असल्याचेही दिसून येते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला कोणते अधिकार आहेत आणि तो त्याचे हक्क कसे वसूल करू शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
जर कंपनी ग्रॅच्युइटीचे पैसे (Gratuity Amount) देण्यास टाळाटाळ करत असेल, तर काही पावले नक्कीच उचलली जाऊ शकतात. कंपनी ग्रॅच्युइटीचे पैसे देण्यास केव्हा नकार देऊ शकते आणि पैसे चुकीच्या पद्धतीने रोखले गेल्यास संबंधित कर्मचारी काय करू शकतो याची माहिती असणे महत्वाचे आहे.
कर्मचाऱ्यांनाही अधिकार
जर कर्मचार्याने कंपनीत पूर्ण पाच वर्षे सेवा केली असेल आणि कंपनी मात्र काहीच कारण नसताना कर्मचाऱ्याला त्याच्या हक्काचे ग्रॅच्युटीचे पैसे (Gratuity Amount) देण्यास नकार देत असेल तर अशा परिस्थितीत कर्मचारी कंपनीविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवू शकतो. नोटीस देऊनही समस्या सुटली नाही, तर कर्मचारी कंपनीविरोधात जिल्हा कामगार आयुक्तांकडे तक्रार करू शकतो. चौकशीत कंपनी दोषी आढळल्यास ग्रॅच्युइटीसोबतच दंड आणि व्याजाची रक्कमही कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याला द्यावी लागते.
कंपनी विनाकारण ग्रॅच्युइटी थांबवू शकत नाही
कोणतीही कंपनी कोणत्याही कारणाशिवाय आपल्या कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युटीचे पैसे रोखू शकत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले असेल आणि त्यात कर्मचारी दोषी आढळल्यास ग्रॅच्युटीची रक्कम रोखली जाऊ शकते. मात्र त्यापूर्वी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावावी लागेल. यानंतर कंपनीला पुरावे आणि खरी कारणे सादर करावी लागतील. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकूनच अंतिम निर्णय घेतला जातो.
कंपनी सर्व पैसे हडप करू शकत नाही
एखाद्या कर्मचाऱ्याच्या वागणुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे कंपनीचे काही नुकसान झाले आणि तपासात कर्मचारी दोषी आढळला तर कंपनी ग्रॅच्युटीची संपूर्ण रक्कम (Gratuity Amount) रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत कंपनी ग्रॅच्युटीच्या रकमेतून तेवढीच रक्कम वजा करू शकते जेवढी रकमेचे नुकसान झाले आहे. उर्वरित ग्रॅच्युटीच्या रकमेचा अधिकार कर्मचाऱ्याकडे आहे.