Grapes Harvest Festival । द्राक्ष उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! पर्यटन संचालनालयामार्फत नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे आयोजन

Grapes Harvest Festival । राज्यात खासकरून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यटन संचालनालयामार्फत नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

खास शेतकऱ्यांना व्यासपीठ देण्यासह द्राक्ष उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच नाशिकची प्रसिध्दी आणि प्रचार करण्यासाठी नाशिक विभागात उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक यांच्यामार्फत नाशिकमध्ये शनिवार आणि रविवार दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिकमध्ये हॉटेल एमराल्ड पार्क ( ग्रीन व्हियू हॉटेल) येथे दुसरा नाशिक ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल 2024 होणार आहे. त्याद्वारे ताजी द्राक्ष खरेदी करण्यासह, द्राक्ष बागांना भेटी आणि द्राक्षाचा विविध जाती पाहण्याची संधी, नाशिक मधील काही प्रसिद्ध वायनरीना भेट देता येतील.

दरम्यान, या ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात द्राक्ष शेती, द्राक्ष हार्वेस्टिंग (काढणी), द्राक्षाच्या विविध जाती, आधुनिक पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन, पॅकेजिंग बघता येणार आहे. इतकेच नाही तर द्राक्षावर प्रोसेसिंग करून तयार केलेले विविध पेय, पदार्थ आणि वाईन टेस्ट घेण्याची संधी भेटणार असून द्राक्ष खरेदीसह आकर्षक खेळ आणि लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टची व विविध खाद्य चाखण्याची पर्वणी खास नाशिककरांसाठी उपलब्ध होणार आहे.

यंदा सलग दुसऱ्यावेळी पर्यटन संचालनालयामार्फत हा महोत्सव होत आहे. नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महोत्सवाला मिळत असून नाशिक मधील प्रसिद्ध द्राक्षांचे ब्रडिंग करण्यास कृषी पर्यटनास चालना देण्यासाठी नाशिक द्राक्ष पर्यटन महोत्सव आयोजित केलाय. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन पर्यटन संचानालयच्या वतीने केले आहे.

तुम्ही महोत्सवासंबंधी अधिक माहितीसाठी 9890011120, 09890404253, 9822439051 नंबर वर संपर्क साधू शकता. तसेच [email protected] या ईमेल आणि www.maharashtratourism.gov.in वेबसाईटवर संपर्क साधू शकता.

Leave a Comment