Government Scheme : सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. ज्याचा देशातील करोडो नागरिक लाभ घेत आहेत, पण अनेकजणांना या योजनांची माहिती नसते. त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना होय.
पीएम विश्वकर्मा योजना
पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना असे या योजनेचे नाव असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटी ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार केवळ 5 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यात येत आहे. ही योजना भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
जाणून घ्या योजनेचे फायदे
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर इत्यादींना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान केले जाते. यासाठी नोंदणी मोफत असून या योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या लोकांना केवळ प्रशिक्षणच दिले जाणार नाही, तर ते कमी व्याजदरात कर्जही घेता येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपकरणे खरेदीसाठी 15,000 रुपये देखील दिले जातील. पहिले १ लाख रुपये ५ टक्के व्याजाने दिले जातील, त्यानंतर गरज पडली तर २ लाख रुपयांचे कर्ज दुसऱ्या हप्त्यात दिले जाईल.
अशी करा ऑनलाइन नोंदणी
- सर्वात अगोदर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmvishwakarma.gov.in वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड वापरून येथे नोंदणी करा.
- आता OTP प्रमाणीकरणाद्वारे तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड सत्यापित करा.
- पडताळणी प्रक्रियेनंतर नोंदणी फॉर्म भरावा लागणार आहे. यात तुम्हाला नाव, पत्ता आणि व्यवसायाशी संबंधित माहिती इत्यादी टाकावी लागणार आहे. यानंतर नोंदणी फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला डिजिटल आयडी आणि विश्वकर्मा योजना प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
- क्रेडेन्शियल वापरून पीएम विश्वकर्मा योजना पोर्टलवर लॉग इन करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पोर्टलवर विविध योजना घटकांसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर योजनेच्या तपशीलानुसार तुम्हाला कागदपत्रे येथे अपलोड करू शकता.
- यानंतर अर्ज विचारार्थ सादर करावा लागणार आहे.
- आता अधिकारी तुमच्या प्राप्त अर्जाची पडताळणी करतील. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.
जाणून घ्या पात्रता
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी भारताचे नागरिक असावे. तसेच अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.