Gold Price । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात कपात केली आहे. यापूर्वी सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 15 टक्के होते. यात सरकारकडून मोठी घट करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क हे थेट सहा टक्क्यांवर आले आहे. प्लॅटिनम धातूवरील सीमाशुल्क 6.4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
येत्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण होईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला होता. पण महाराष्ट्रात आतापासूनच याचा परिणाम पाहायला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर जळगावमध्ये त्याचा परिणाम पाहायला मिळाला. सोन्याच्या दरात प्रतितोळा 2 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे आता सोने खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या निर्णयामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदीदारांना एका मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांची खरेदी वाढून दागिने तयार करणाऱ्या क्षेत्राची भरभराट होईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतातील सोन्याची एकूण आयात अंदाजे 2.8 लाख कोटी रुपये इतकी होती. तर 15 टक्के आयात शुल्क दराने उद्योगाचा सीमाशुल्क भरणा अंदाजे 42 हजार कोटी रुपये इतका आहे.
हा झाला महत्त्वाचा बदल
- सोने, चांदीवरील सीमा शुल्क – 6 टक्के
- प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
- अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के केला आहे.