शेळ्यांची निवड (Goat Farming marathi info), गोठा बांधकाम (shed construction) आणि पैदास कार्यक्रम याबरोबरच त्यांचे आहार व्यवस्थापन हा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. पहिले तिन्ही मुद्दे १०० टक्के योग्य पद्धतीने केले आणि पुढे आहार व्यवस्थापनात शेळीपालकांनी माती खाल्ली तर, अवघ्या व्यवसायाचीही माती होऊ शकते. शेळ्यांना कमी खर्चात मात्र, गरजेनुसार सकस चारा व पशुखाद्य देणे आवश्यक आहे. नाहीतर शेळ्यांचा जाप्ता खराब होऊन डोकेदुखी वाढू शकते. शेळीपालकांनी निवड पद्धतीने जातवान शेळ्या आणि बोकड यांचा कळप निर्माण केला तरीही त्यांचे अनुवंशिक गुणधर्म प्रक्षेपित होण्यासह पुढील पिढीत उतरण्यासाठी सुयोग्य आहार व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठीचे महत्वाचे मुद्दे असे :

  • शेळ्या खाण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आणि चंचल असतात. त्या निवडून चांगले खातात आणि निरुद्योगी चोथ्याकडे अजिबात ढुंकूनही पाहत नाहीत.
  • शेळ्या इतर प्राण्यांप्रमाणे एकाच जागेवर उभ्या राहून खात नाहीत. उलट इकडून-तिकडे फिरत आणि खाण्याची मजा घेत शेळ्यांचे पोट भरणे चालू असते.
  • अशावेळी आपण देत असलेल्या चारा किंवा पशुखाद्य यांचा दर्जा चांगला असल्याची काळजी घ्यावी.
  • शेळ्यांचे सर्वात आवडते खाद्य म्हणजे झाडपाला. त्या रानावनात फिरताना सहजपणे खायला मिळणारे अन्न सोडून मस्तपैकी झाडांच्यावरील किंवा वेलींच्या वेढ्यात पडलेले लुसलुशीत असे खाद्य आवडीने खातात.
  • पूर्ण खाण्यापेक्षा पाने किंवा झाड ओरबाडून खाण्याकडेच शेळ्यांचा कल असतो. त्यानुसार दिवसभरात त्यांना चरायला नेताना अशाच ठिकाणांची निवड करावी. माळरानावर किंवा डोंगराच्या पायथ्याला त्यांना नेणे शक्य असल्यास तसे नियोजन करावे.
  • शेळ्यांच्या एकूण खाण्याच्या सवयीचा अभ्यास केल्यावर असे आढळले आहे की, त्या जास्तीतजास्त फ़क़्त ३० टक्के भूक गवत खाऊन भागवतात. उलट झाडपाला किंवा रानातील वनस्पती त्या आवडीने खातात आणि त्यांचे एकूण खाद्यातील प्रमाण ७० टक्क्यापर्यंत असू शकते.
  • शेळ्या हिरवा चारा, वळलेले गवत किंवा वैरण, खुराक (पशुखाद्य) असे सर्व प्रकारचे अन्न खातात. त्यातील हिरवा व वाळलेला चारा खाल्ल्याने त्यांचे पोट भरून रवंथ करण्याची क्रिया सुरळीत राहते. तसेच याद्वारे त्यांना क्षार आणि जीवनसत्वे मिळतात.
  • शेळीचे वजन ३० किलो असे गृहीत धरल्यास त्यामध्ये तिला ३ किलो हिरवा चारा, अर्धा किलोपेक्षा जास्त वाळलेला चारा आणि पाव किलो खुराक अशा पद्धतीने चारा व्यवस्थापन करावे. शेळीच्या वजनाच्या प्रमाणानुसार त्यात आवश्यक ते बदल करावेत.
  • प्रजननाचा हंगाम आणि गर्भधारणा झाल्यावर अखेरच्या दोन महिन्यात शेळ्यांना आणखी जास्त पशुखाद्य द्यावे. म्हणजे अशावेळी ४०० ते ५०० ग्रॅम इतके पशुखाद्य दिल्यास अनुक्रमे जुळ्या कराडांचे प्रमाण वाढण्यासह पोटातील गर्भात असलेल्या कराडांचे वजन वाढण्यास मदत होते.
  • शेळ्यांच्या दुधामध्ये जसे प्रथिन असते. तसेच त्यांनाही शरीराच्या वाढीसह निरोगी राहण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांना आहारात सरासरी १७ टक्के पचनीय कच्चे प्रथिन व सुमारे ६५ टक्के प्रमाणातील पचनीय पदार्थ देण्याची काळजी घ्यावी.

शेळ्या किंवा बोकड यांच्या वाढीवर आणि पैदाशीवर या व्यवसायाचे नफ्या-तोट्याचे गणित ठरते. हेच लक्षात घेऊन हा व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी आणि नफ्याचे प्रमाण वाढवण्यासाठी योग्य पद्धतीने आहार व्यवस्थापन करावे.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

(क्रमशः) वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Share.

Leave A Reply

Exit mobile version