Genesh Festival: पुणे: पुण्यातील गणेशोत्सव हा भव्य असतोच पण त्यासाठी कार्यकर्ते कलाकार कष्ट घेत असतात हे तेवढेच खरे आहे. आज विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने कलाकारांनी तब्बल 15 क्विंटल रांगोळी, दहा क्विंटल गुलाल वापरून रांगोळी काढलीच शिवाय पाय घड्या घेतल्या. या पायघड्या आणि रांगोळी अधिक आकर्षक व्हावे यासाठी 200 किलो रंगांचा वापर करण्यात आला. हे रांगोळी काढण्याचे काम काही प्रमाणात अर्धवट असल्याने मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मिरवणूक दीड तास खोळंबली होती. अखेर दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी कसबा गणपती टिळक चौकातून पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
विसर्जन मिरवणूक मार्गावर काढण्यात आलेल्या सर्व रांगोळी आणि पायघड्यांसाठी तब्बल १ हजार किलो (१० क्विंटल) गुलाल, दीड हजार किलो (१५ क्विंटल) पांढरी रांगोळीआणि २०० किलो (२ क्विंटल) विविध रंगांचा वापर करण्यात आला. पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमीच्या (न्यास) या सर्व रांगोळी मोफत काढण्यात आल्या आहेत. या अकादमीच्यावतीने गेल्या २४ वर्षांपासून एक सामाजिक संकल्पना घेऊन रांगोळी काढली जाते. मंडई परिसरातील बाबू गेनू चौकापासून अलका टॉकीज चौकापर्यंत विविध १२ चौकांमध्ये या रांगोळी काढण्यात आल्या आहेत. या रांगोळी काढण्यासाठी संस्थेच्या तब्बल ३५० सदस्य सहभागी झाले होते. यामध्ये अगदी आठ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंतच्या सर्व वयोगटातील सदस्यांनी सहभाग घेतला. युकक-युवतींचा सर्वाधिक सहभाग हे या रांगोळी गटांचे वैशिष्ट्य ठरले.
राष्ट्रीय कला अकादमीचे संस्थापक संचालक अतुल सोनवणे म्हणाले, “आम्ही दरवर्षी एक सामाजिक थिम घेऊन कलेच्या माध्यमातून गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर मोफत रांगोळी काढून या रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असतो. हे काम आम्ही गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने करत आहोत. यापुढेहु चालूच ठेवणार आहोत. पुढच्या वर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत आमचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. “