Ganesh Festival: पुणे: पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) गणपती विसर्जनासाठी हौद, फिरते हौद व अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी त्याबद्दल पुरेशी माहिती न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच महापालिकेने करोनापूर्व काळातील विसर्जन हौदांची जागा बदलल्याने नागरिकांच्या गोंधळात भरच पडत आहे. गणेशोत्सवात (Ganesh festival) पाचव्या दिवशी १५ हजार ८३८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या NGT आदेशानुसार नदीपात्रात, वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यावर पालिकेने बंदी घातली आहे. त्यासाठी काही ठिकाणी बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. तसेच महापालिकेतर्फे भिडे पूल तसेच अमृतेश्वर, वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाटांजवळील कृत्रिम विसर्जन हौद बंद ठेवण्यात आले आहेत. तर दत्तवाडी, एसएम जोशी पूल आदी ठिकाणी हौद उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी भिडे पूल (Bide Bridge), अमृतेश्वर, वृद्धेश्वर, सिद्धेश्वर घाटावर विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषत दीड दिवसाच्या, तीन न पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
हौदांच्या बदललेल्या जागांबद्दल घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे चौकशी केली असता, त्यांनी ही जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची असून त्यांनीच जागा बदलल्याचे स्पष्ट केले. याबाबत कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आशिष महाडदळकर (Ashish Mahadalkar) यांनी हौदांची जागा बदलण्यात आल्याचे मान्य करत त्यासाठी पर्यायी जागांची व्यवस्था केल्याचेही स्पष्ट केले. करोनापूर्वी २०१९ साली नदीपात्रात अनेक ठिकाणी हौद होते. या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले गेले. त्यामुळे येथील काही हौदांचे व मांडवांचे नुकसान झाले. त्याचबरोबर वीजेच्या खांबावरून पाण्यात वीजप्रवाह उतरल्याची घटनाही घडली. त्यामुळे तेव्हापासून नदीपात्राच्या अगदी लगत असलेले हौद बंद केले गेले. यंदाही हे हौद बंद ठेवून लगतच्या शाळांमध्ये हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे, असे महाडदळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधांचा लाभ घेत, नागरिकांनी पाचव्या दिवशी १५ हजार ८३८ मूर्तींचे विसर्जन केले. तर महापालिकेच्या विसर्जन हौद, संकलन केंद्र आदी यंत्रणेव्दारे ३१ सप्टेंबर ते २ सप्टेंबरपर्यंत जमा झालेल्या २७ हजार ३७५ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने वाघोली येथील खाणीमध्ये विसर्जन केले आहे. तर रविवारी शहरात २९ हजार ६७७ किलो निर्माल्य जमा झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत Asha Raut यांनी दिली. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नदीपात्रात पाच हौद, अन्य १३ ठिकाणी २६ हौद तसेच नऊ फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबाबत माहिती देणारे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत.
मनसेचे आंदोलन : नदीपात्रालगतचे हौद बंद केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे MMS सोमवारी नदीपात्रात आंदोलन करण्यात आले. नदीपात्रात लावलेले बॅरिकेड्स कार्यकर्त्यांनी तोडले. माती टाकून बंद करण्यात आलेले हौद दोन दिवसात खुले न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला. मनसेचे कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे व शहर संघटक श्री प्रल्हाद गवळी यांनी होडीतून नदीत जात गणपती विसर्जन केले. नीलेश हांडे, रवि सहाणे, वसंत खुटवड आदी उपस्थित होते