Ganesh Festival: पुणे (Pune): गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात कृत्रिम हौदांची सोय केली आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन नदी आणि नैसर्गिक स्त्रोतांमध्ये न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०३ ठिकाणी कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या विसर्जनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, क्षेत्रीय कार्यालय आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या मुख्य विभागामार्फत एकूण २०३ फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २१६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आणि मूर्ती दान केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच, कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे. महापालिकेमार्फत उभारलेल्या सर्व यंत्रणांची माहिती www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शाडूच्या मातीचा पुनर्वापर : महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘स्वच्छ’ पुणे सेवा सहकारी संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतर शाडूची माती संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. शाडू मातीचा पुनर्वापर केल्यास मूर्तिकारांना मूर्ती किंवा माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. याबाबतची सविस्तर माहिती www.punravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
निर्माल्यांमध्ये प्लॅस्टिक नको (Plastic ban in pune and Maharashtra) : निर्माल्यांमध्ये केवळ हार, पाने आणि फुले एवढ्याच गोष्टींचा समावेश असतो. त्यामध्ये प्लॅस्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा फोटो यांचे अवशेष आणि कुठले खाद्यपदार्थ टाकू नयेत. कमिन्स इंडिया, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. हे खत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.