नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पुन्हा एकदा रशियाला पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली आणि युक्रेन युद्धाबाबत पुन्हा एकदा शांततेचा संदेश दिला. ते म्हणाले की, चर्चेकडे परत यावे यावर भारत ठाम आहे. जयशंकर द्विपक्षीय बैठकी दरम्यान म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार केला तर गेली काही वर्षे कोरोना महामारीमध्ये गेली आहेत. जगभरातील देशांना आर्थिक दबाव आणि व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. या सगळ्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. आता यानंतर युक्रेन युद्धाचा जगावर होणारा परिणाम आपण पाहत आहोत.
परराष्ट्र मंत्री म्हणाले, की या व्यतिरिक्त दहशतवाद आणि हवामान बदलासारखे मुद्दे देखील आहेत ज्यांचा विकास आणि समृद्धीवर परिणाम झाला आहे. आमच्या चर्चेचा जगातील सर्व परिस्थितींवर परिणाम होईल. याशिवाय प्रादेशिक मुद्द्यांवरही आमच्या चर्चेतून तोडगा निघेल. रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांचा उल्लेख करताना जयशंकर म्हणाले की, आमचे संबंध प्रत्येक पातळीवर अतिशय बळकट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलीकडेच सप्टेंबरमध्ये समरकंद येथे भेट झाली. एवढेच नाही तर यादरम्यान एस. जयशंकर यांनी रशियाला आठवण करून दिली, की पाश्चिमात्य देशांच्या विरोधानंतरही दोन्ही देशांमध्ये तेलाचा व्यापार कसा सुरू राहिला.
जयशंकर म्हणाले की, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळातही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे. पाश्चिमात्य देशांच्या सर्व विरोधानंतरही हा व्यवसाय सुरूच आहे. “भारत आणि रशियाचे स्थिर संबंध आहेत. आमचे नाते फार पूर्वीपासून आहे आणि एकमेकांवर नेहमीच विश्वास आहे. रशियाकडून तेल खरेदी आणि पाश्चात्य देशांच्या दबावाबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर एस. जयशंकर म्हणाले की, विविध कारणांमुळे ऊर्जा बाजार दबावाखाली आहे.
तेल आणि वायूच्या वापरामध्ये भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेला देश आहे. पण लोकांची कमाई फारशी नाही. आम्ही योग्य दराने संसाधने खरेदी करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचा आम्हाला फायदा झाला आहे. आम्ही हे चालू ठेवू. जयशंकर यांच्या रशिया दौऱ्यावर जगाच्या नजरा लागल्या आहेत. युक्रेन आणि रशियामधील युद्धात भारतही मध्यस्थी करत असल्याची चर्चा आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधांच्या आधारे मध्यस्थी करण्याबाबतही अटकळ करण्यात आली आहे.
- Read : Russia Ukraine War : युद्धाच्या संकटात यु्क्रेनमध्ये होतोय ‘हा’ बदल; सरकारसमोर मोठे आव्हान..
- चीनची खुमखुमी वाढली..! रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना केली ‘ही’ मोठी घोषणा; जाणून घ्या..