मुंबई:अन्न व औषध प्रशासनाने दिवाळीत मिठाई दुकांनांमधील इतका खोटा मावा जप्त केला, दुध भेसळ पकडली अश्या अनेक बातम्या इतकी वर्ष आपण पाहतोय. पण आता मांसावर देखील अन्न व औषध प्रशासनाची नजर असणार आहे. चिकन आणि मासे विक्री करणाऱ्यांची आतापर्यंत स्वच्छता या दृष्टिकोनातून तपासणी होत होती. परंतु २००७ नंतर पहिल्यांदाच विक्रेते वा रेस्तराँतील चिकन आणि मासे यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवीले जाणार आहेत. प्रशासनाच्या प्रयोगशाळेत आतापर्यंत अशी तपासणी न झाल्याने सुविधांचा अभाव असल्यामुळे खासगी प्रयोगशाळेत हे नमुने तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. राज्यभरातील चिकन व मासे विक्री करणाऱ्यांच्या नमुन्यांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत अशी तपासणी गेल्या १५ वर्षांत झाली नव्हती.
या विक्रेत्यांची तपासणी करताना प्रशासनाच्या निरीक्षकांकडून फक्त स्वच्छतेची पाहणी केली जाते. मात्र चिकन व मासे यांचे नमुनेही तपासले पाहिजेत, अशी कायद्यातच तरतूद आहे. परंतु तसे केले जात नव्हते. विकले जाणारे चिकन वा मासे खाण्यायोग्य आहेत का याची तपासणी केली जाणेही आवश्यक असल्यानेच हे आदेश देण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले. चिकन वा मासे मग ते कुठल्याही दुकानात वा रेस्तराँतून विकले जात असतील तर ते आरोग्याला अपायकारक नाहीत ना याची तपासणी केली जाणार आहे, असे काळे यांनी सांगितले. हे नमुने घेण्यासाठी मायक्रोबायोलॅाजिस्ट हवा, अशी कायद्यात तरतूद असल्याचे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. मात्र अन्न व औषध प्रशासनात नियुक्त झालेले अधिकारी हे असे नमुने घेऊ शकतात, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आता ही अचानक तपासणी कोणत्याही क्षणी सुरू होणार आहे.
must read’