मुंबई : सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात महागाई अत्यंत वेगाने वाढत चालली आहे. रशिया युक्रेन युद्धाचाही त्यावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. देशातही महागाई वेगाने वाढत चालली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात ज्या बाबतीत अंदाज व्यक्त केला जात होता अखेर तसेच घडले आहे. फेब्रुवारी महिन्यातील महागाईची आकडेवारी समोर आली आहे. घाऊक किंमत निर्देशांक जानेवारीत 12.96 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये घाऊक महागाई दर फक्त 4.83 टक्के होता. जानेवारीमध्ये घाऊक महागाईचा दर 12.96 टक्के होता. डिसेंबर 2021 मध्ये, घाऊक महागाई दर 13.56 टक्के होता. नोव्हेंबरमध्ये ही महागाई 14.23 टक्के होती. सलग अकराव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात गेला आहे. वाढती महागाई हा सरकार, अर्थव्यवस्था आणि रिजर्व्ह बँकेसाठी गंभीर मुद्दा बनला आहे. पुढील महिन्यात रिजर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. त्याआधी 16 मार्च रोजी यूएस फेडरल रिजर्व्ह व्याजदराबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. महागाई वाढल्याने रिजर्व्ह बँकेवर धोरण बदलण्याचा दबाव वाढेल.
जानेवारी महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर 6.01 टक्के होता, जो रिजर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या मर्यादेच्या पलीकडे होता. ही सात महिन्यांतील सर्वाधिक पातळी होती. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 5.59 टक्के होता. हा 5 महिन्यांतील सर्वाधिक दर होता. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 4.91 टक्के, ऑक्टोबरमध्ये 4.48 टक्के होती. एक वर्षापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाई दर 4.59 टक्के होता.
बदललेल्या जागतिक परिस्थितीत सिटी बँकेने पुढील आर्थिक वर्षासाठी महागाई दरात वाढ केली आहे. त्याने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी चलनवाढीचा अंदाज 70 आधार अंकांनी 5.7 टक्क्यांनी वाढ केला आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 110-120 डॉलरच्या श्रेणीत राहिल्यास पुढील आर्थिक वर्षात देशातील सरासरी किरकोळ महागाई दर 6.3 टक्क्यांवर पोहोचेल, असे त्यांनी आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. तसेच आगामी काळात महागाई आणखी वाढण्याचा अंदाज अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आम आदमीला पुन्हा झटका..! महागाई वाढ रोखणे होतेय अशक्य.. पहा, किती वाढलाय महागाईचा दर