Fawad Alam : पाकिस्तानी संघाच्या स्टार फलंदाज फवाद आलमने अनेकांना धक्का देत अचानक निवृत्तीची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी संघाचा फलंदाज फवाद आलमने आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.
काही दिवसापूर्वी पाकिस्तान कसोटी संघाकडून शेवटचा कसोटी सामना खेळणारा फलंदाज फवाद आलम याने निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय फवाद आलमला पाकिस्तान संघाकडून जास्त खेळण्याची संधी मिळू शकली नाही त्यामुळे त्याने आता निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
फवाद आलमने 2007 सालीच पाकिस्तान संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याला काही कसोटी सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले आणि 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याला पुन्हा पाकिस्तान कसोटी संघात स्थान देण्यात आले.
या कसोटी सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत 55 च्या सरासरीने धावांचा डोंगर उभा केला. पुनरागमनानंतरच्या तिसऱ्या सामन्यात त्याने न्यूझीलंड संघाविरुद्ध झंझावाती शतक ठोकले आणि दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धही उत्कृष्ट शतके झळकावली.
यानंतर 2022 च्या सुरुवातीला श्रीलंका संघाविरुद्धच्या कसोटीत फवादची बॅट फार काही करू शकली नाही. त्याला 4 डावात केवळ 33 धावा करता आल्या आणि त्यानंतर त्याला पाकिस्तानी संघातून सतत वगळण्यात आले. फवाद 2009 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या चॅम्पियन टीमचा देखील भाग होता.