Exploitation In Aksai Chin India Gold Mine: दिल्ली: भारताचा मुजोर आणि श्रीमंत शेजारी चीन ही अवघ्या जगाची डोकेदुखी बनला आहे. त्याच मुजोर देशाने आता लडाखमध्ये 50,000 हून अधिक सैनिक आणि प्राणघातक शस्त्रे तैनात करून भारतावर दबाव वाढवला आहे. तसेच चीनने आता या भागातून भारताच्या नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू केली आहे. 40 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेल्या अक्साई चिनच्या ओसाड डोंगराळ प्रदेशातून अब्जावधी डॉलर्सचा खजिना काढण्यात आता चीन गुंतला आहे. ही भारताची भूमी आहे. मात्र, सध्या चीनच्या ताब्यात आहे. जिथून आता चीन आणखी सोनेरी होण्याची स्वप्न पाहत आहे. (Zinc Mine Ladakh And Gold Mine Near Arunachal Pradesh)
फक्त 10 हजार इतकीच लोकसंख्या असलेल्या अक्साई चिन परिसरात आशिया खंडातील झिंकचा सर्वात मोठा साठा सापडला आहे. एवढेच नाही तर अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भागात सोन्या-चांदीचा प्रचंड साठा चीनच्या हातात सापडला आहे. त्यासाठी चीन खोदकामाच्या तयारीत आहे. हा साठा सुमारे 60 अब्ज डॉलर्स किमतीचा असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच चीनने आता अक्साई चिनला तिबेट आणि शिनजियांगशी रस्ते मार्गाने जोडले आहे. एवढेच नाही तर अक्साई चीन क्षेत्र चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अगदी जवळ आणलेले आहे. ज्याद्वारे ड्रॅगन शिनजियांग प्रांताला पाकिस्तानच्या ग्वादर बंदराशी जोडत आहे. एकूणच भारताकडून ताब्यात घेतलेल्या जमिनीतून आता सोने काढून हा मुजोर देश आणखी शिरजोर होण्याची चिन्हे आहेत.
युरोपीय नेदरलँड्स देशातील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि नेदरलँड्स डिफेन्स अकादमीच्या ‘राइजिंग टेन्शन इन द हिमालय’ या नावाच्या ताज्या संशोधनानुसार यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. यानुसार चीनने अक्साई चिनमध्ये खनिज शोधाची तयारी वेगवान केली आहे. हा पश्चिम भागातील जस्त खनिजाचा जगातील सर्वात मोठा साठा आहे. पूर्वेकडील क्षेत्रात म्हणजे अरुणाचल प्रदेशाजवळील मॅकमोहन रेषेपासून अवघ्या 50 किमी अंतरावर म्हणजे लुंजे काउंटीमध्ये चीनकडे सोन्या-चांदीचा प्रचंड साठा सापडला आहे. त्यामुळेच तर चीन या भागात मोठ्या प्रमाणावर जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. तसेच मुजोर चीन आता ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण बांधण्याच्या तयारीत आहे. ज्याला भारताचा कडाडून विरोध आहे. कारण ब्रह्मपुत्रा नदी ही केवळ भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठीच नाही तर बांगलादेशची जीवनरेखा म्हणून ओळखली जात आहे. मात्र, लडाख तणावानंतर चीनने भारताला ब्रह्मपुत्रा नदीतील पाण्याची आकडेवारी देणे बंद केले होते, आता ते पुन्हा सुरू झाले आहे. कारण ही आकडेवारी भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, ब्रह्मपुत्रा नदी भारतीय राज्यांमध्ये पूर आणते.
अक्साई चिन परिसरात आशियातील सर्वात मोठे झिंकचे साठे मिळाले आहेत. हे जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात मोठे साठे आहेत असे मानले जाते. येथून 19 दशलक्ष टन उच्च दर्जाचे झिंक आणि शिसे काढले जाऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. या एकाच खाणीमुळे चीनचा झिंकचा पुरवठा जवळपास दुप्पट होईल. चीन सध्या लॅटिन अमेरिकेतून सर्वाधिक शिसे आणि जस्त आयात करत आहे. परंतु कोरोना निर्बंधांमुळे त्याला पुरवठा टंचाईचा सामना करावा लागला आहे. त्यावर आता त्यांना उत्तर मिळाले आहे. चीनची शिसे आणि जस्त आयात 2020 मध्ये 31.7 टक्के आणि गेल्या वर्षी 17.5 टक्क्यांनी वाढली आहे. चीनमधील 27 प्रांत आणि प्रदेशांमध्ये झिंक आणि शिसे सापडले आहे.
झिंक आणि शिशाची सध्या जगात खूप मागणी आहे. चीन या भागातील साठ्यांमुळे आणखी श्रीमंत झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री, रसायन, बांधकाम, खत, हलके उद्योग आणि औषधी उद्योग यासह अनेक उद्योग चालविण्यासाठी हे दोन्ही धातू आवश्यक असतात. चीन हा जगातील जस्त खनिजाचा प्रमुख उत्पादक आणि ग्राहक दोन्ही आहे. भारताला अन्नधान्याच्या उत्पादनातही झिंकची गरज आहे आणि त्यामुळेच आपला देश रशिया आणि इतर अनेक देशांकडून याची आयात करत आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, चीनने अक्साई चिनमध्ये लक्षणीय लष्करी वाढ केली आहे. या अहवालात 15 वर्षांच्या चिनी घुसखोरीचा डेटा वापरण्यात आला असून याद्वारे त्यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
मुजोर चीनला भारताच्या अरुणाचल सीमेजवळील लुंजे काउंटीमध्येही सुमारे ६० अब्ज डॉलर किमतीचे सोने, चांदी आणि इतर मौल्यवान खनिजे सापडली असल्याचे स्पष्ट झालेले आहे. म्हणूनच या भागात चीनची घुसखोरी प्रकरणे वाढली आहे. चीन आता हुआयू सोन्याच्या खाणीचे उत्खनन करत असून डोकलाम वादानंतर तर चीनने या उत्खननाच्या कामाला आणखी गती दिली आहे. हे सोने काढण्यासाठी चीनने या भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य तैनात केले आहे. आता चीन तिबेटवरील सार्वभौमत्वाचा दावा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हान वंशाच्या लोकांना अरुणाचल प्रदेश भागाला लागून असलेल्या भागात वसवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सीमेपासून अवघ्या 15 किमी अंतरावर सोन्याची खाण विकसित करणे हे आपले सार्वभौम धोरण चालू असल्याचा दावा करण्याचा प्रकार आहे.