दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या मुद्द्यावर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. कंपन्यांनी सदोष वाहने परत आणण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावे, असे मंत्री गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, मार्च, एप्रिल आणि मेमध्ये तापमानाचा पारा वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटरीमध्ये काही समस्या निर्माण होतात. देशातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने नुकतेच काम सुरू केले आहे आणि सरकार त्यांच्यासाठी कोणताही अडथळा निर्माण करू इच्छित नाही.
“परंतु सुरक्षा ही सरकारसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे कंपन्या सदोष वाहने दुरुस्त करण्यासाठी परत आणण्यासाठी त्वरित निर्णय घेऊ शकतात. गडकरी म्हणाले, की “आम्हाला समजले आहे की इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने नुकतेच काम सुरू केले आहे. आम्ही त्यांच्यासाठी कोणताही अडथळा निर्माण करू इच्छित नाही. मात्र सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता असून मानवी जीवनाशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असे गडकरींनी आधीच सांगितले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर जी वाहने सदोष आहेत, त्यांना परत मागविण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
ओला कंपनीच्या पुण्यातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटनेनंतर सरकारने गेल्या महिन्यात चौकशीचे आदेश दिले होते. मंत्रालयाने सीईएफएस केंद्राला आग कशामुळे लागली याची चौकशी करण्यास सांगितले आहे. याबरोबरच ते रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. मंत्रालयाने CFIS ला अशा घटना रोखण्यासाठी निर्णय घेण्यासही सांगितले आहे.
दरम्यान, ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) ते प्युअर ईव्ही, ओकिनावा (Okinawa) या काही कंपन्यांच्या डझनभर इलेक्ट्रिक दुचाकींना गेल्या काही आठवड्यात आग लागली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये येणाऱ्या समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती गरज पडल्यास आवश्यक सूचनाही देईल. इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Pure EV ने इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीमध्ये (Battery) स्फोट झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. यासह कंपनीने 2 हजार वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या इंधनाचे वाढत्या दरांमुळे लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा विचार सुरू केला होता. या वाहनांना हळूहळू मागणीही वाढत आहे. मात्र, आता अशा घटना घडू लागल्याने इलेक्ट्रिक वाहनांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारनेही आता या घटनांची दखल घेतली आहे.