मुंबई : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) राजकारणात आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आझमगड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी करहल विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली, त्यानंतर ते आमदारकी सोडतील किंवा खासदारकीचा राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखिलेश यादव मंगळवारी दुपारी लोकसभेत पोहोचले, जिथे त्यांनी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि राजीनामा सादर केला.
अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार आहे. खासदारकी सोडण्याचा निर्णय घेण्याआधी अखिलेश यादव सोमवारी आझमगडला पोहोचले होते, तिथे त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. येथील आझमगड की करहलची जागा सोडण्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पक्षश्रेष्ठींसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनाच विचारले होते की, ‘तुम्हीच सांगा मी काय करू?’ नेते आणि कार्यकर्त्यांनी मत मांडले आहे, आता पुढचा निर्णय पक्ष घेईल, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, यावेळी त्यांच्या जागा वाढल्या आहेत. तसेच मतांची टक्केवारी सुद्धा वाढली आहे. 2017 च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे 47 उमेदवार निवडून आले होते. यावेळी मात्र 125 उमेदवार विजयी झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. भाजप विजयी असला तरी यावेळी त्यांना काही जागांचे नुकसान सहन करावे लागले आहे. तर समाजवादी पार्टीची विधानसभेतील ताकद वाढली आहे.
अखिलेश यादव यांनी भाजपला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; ‘त्या’ मुद्द्यावरही केलीय जोरदार टीका..