Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog : ‘एनसीबी’चा ‘फर्जीवाडा’ उघड झाला अन फडणवीसांना मलिक हे देशद्रोही असल्याचा साक्षात्कार झाला..!

“मुंबईकरांच्याच नव्हे तमाम महाराष्ट्राच्या हृदयाला झालेली जखम म्हणजे १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट. या जखमेच्या खपल्या काढण्याचं काम विरोधी पक्ष भाजपकडून सध्या सुरु आहे. आझाद मैदानावर इमोशनल भाषणं करुन, जखमींना स्टेजवर आणून मुंबईकरांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईबद्दल भाजपाला आताच का इतका पान्हा फुटला आणि प्रेम उफाळून आलं याचं उत्तर राज्यातील शेंबड्या पोरालाही माहीत आहे,” अशी मांडणी मुक्त पत्रकार आणि राजकीय अभ्यासक सोमनाथ गर्जे (पुणे) यांनी केली आहे. भाजप नि फडणवीस यांच्या राजकीय आंदोलनाचे पितळ उघडे करण्याचे काम करणारा हा लेख आम्ही जसाच्या तसा प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी देशाची आर्धिक राजधानी आहे. मायानगरी आहे, पण इथं वर्षानुवर्षे शिवसेनेची सत्ता आहे आणि ती भाजपाला कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घ्यायचीय. महाराष्ट्राबाबत कुणी कितीही अपप्रचार केला तरी महाराष्ट्र देशात एक नंबरचं राज्य होतं आणि पुढंही राहील. पण हे राज्यही हातातून निसटलं. त्यामुळं राज्याची सत्ता ताब्यात घेता येत नसेल तर किमान सोन्याचं अंडं देणारी मुंबई महापालिका का होईना ताब्यात घेण्यासाठी भाजपाचा हा आटापीटा आहे. त्यासाठीच आजचा हा मोर्चा आहे. त्यासाठी मुंबई बॉम्बस्फोट आणि नवाब मलिक यांचा राजीनामा हे केवळ निमित्त आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जातेय. त्यांच्या अटकेमागील ईडी चा राजकीय हत्यार म्हणून कोण वापर करतंय, हे लोकांना कळत नाही या भ्रमात भाजप असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळा आहे. नवाब मलिक जर देशद्रोही असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहीजे पण ती शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, भाजपला नाही. एका गोष्टीकडे लोकांनी दुर्लक्ष करता कामा नये. नवाब मलिक हे देशद्राही आहेत, याचा साक्षात्कार देवेंद्र फडणवीस यांना असा अचानक का झाला, हे समजून घेणं राज्यातील प्रत्येकाचं कर्तव्य आहे. वीस वर्षांपूर्वीचा व्यवहार एका रात्रीत फडणवीसांना कसा दिसला याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे.

Advertisement

नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चा ‘फर्जीवाडा’ उघड केल्याने भाजपाचा तिळपापड होणं स्वाभाविक होतं. नंतरच्या काळात मलिक यांनी उघड केलेल्या बोगस गोष्टी तंतोतंत खऱ्या होत्या हे उघड झालं. याबाबत भाजप मूग गिळूनच गप्प बसणार पण सत्ताधारी पक्षालाही त्याचं राजकीय भांडवल करता आलं नाही, हेही खरं आहे. ‘फर्जीवाडा’ उघड करता करता मलिक कधी नागपूरच्या वाड्यात शिरले हे भाजपाला समजलंही नाही. एका दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात पुराव्यासह उभं केलं. फडणवीस यांच्या ‘सौ’ च्या अल्बमसाठी कोणत्या माफीयाने फंडींग केलं, याचा पुरव्यासह नवाब मलिक पर्दाफाश केला. त्यांच्या या आरोपाचा एकाही भाजप नेत्याला मुद्देसूद प्रतिवाद करता आला नाही. परंतु मलिकांच्या आरोपानंतर दोन दिवसांनी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे दाऊदशी संबध असल्याचा आरोप केला. स्वतःवर आरोप होताच मलिक हे देशद्रोही आहेत, याचा शोध फडणवीस यांना एका रात्रीत कसा लागला? की गेली वीस वर्षे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती? ज्यामुळे त्यांना नवाब मलिक यांचा व्यवहार दिसला नाही.. पाच वर्षे तर ते राज्याचे अक्षरशः राजे होते. गृहमंत्रीपदही त्यांच्याकडेच होतं. पण तरीही नवाब मलिक यांचा देशद्रोह त्यांना दिसला नाही. हे एकतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना आलेलं अपयश आहे आणि ते त्यांनी मान्य करावं नाहीतर मलिक यांचं कनेक्शन माहित असतानाही त्यांना पाठीशी घातल्याची जबाबदारी घ्यावी. मलिक यांचे संबंध दाऊदसोबत संबंध असतील आणि ते माहित असूनही इतकी वर्षे (पाच वर्षे मुख्यमंत्री व गृहमंत्री) त्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हेही तेवढेच दोषी नाहीत का? पण आता हे न समजण्याइतपत जनता दुधखुळी नक्कीच नाही.

Loading...
Advertisement

गेली पाच वर्षे फडणवीस यांनी शिवसेनेच्या मांडीला-मांडी लावून सत्तेची उब घेतली. पंचवीस वर्षे त्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या पण सत्ता जाताच तीच शिवसेना त्यांना भ्रष्टाचाराचा महामेरु वाटायला लागली. किरीट सोमय्यांना शिवसेनेमुळे खासदारकीवर पाणी सोडावे लागले याचं शल्य त्यांना आहेच. तेच ओळखून भाजपाने त्यांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची प्रकरणं काढण्याची असाईन्मेंट दिली गेली. संजय राऊत यांच्या भाषेत सांगायचं तर गेली पंचवीस वर्षे ‘महात्मा’ सोमय्यांना ही प्रकरणं कशी दिसली नाहीत. आजच का दिसतात? संजय राऊत यांनी पुराव्यासह सोमय्यांच्याही ‘प्रकरणां’चा पर्दाफाश करताच ‘दमडीचा संबंध नाही’ यापलिकडे सोमय्यांना उत्तर देता येत नाही. यातच कोणाचे हात किती बरबटलेले आहेत, हे दिसतं.

Advertisement

राहीला प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत फोडलेल्या व्हिडिओ बॉम्बचा. फडणवीस यांनी ज्याप्रकारे संपूर्ण घटनाक्रम कथन केला त्याचं खरंच कौतुक आहे. ही घटना सत्य असेल तर असा कट करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई व्हायला हवी आणि ती होईल. जरी झाली नाही तरी ईडी, एनसीबी, सीबीआय, एनआयए, आयटी या संस्था भाजपच्या घरी धुणीभांडी करताना दिसतच आहेत. त्यांना सांगून ते आपल्याला हवी ती कारवाई करु शकतात, हे लोकांना माहित आहे. शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या गृहमंत्रीपदाच्या काळात विरोधकांसोबतच स्वपक्षीयांचेही फोन टॅप करण्याचं काम कुणी केलं, हेही लवकरच स्पष्ट होईल. यातून वाचण्यासाठी रश्मी शुक्ला यांची न्यायालयात पळापळ सुरु आहे. त्यामुळं सरकारी यंत्रणांचा गैरवापर कुणी सुरु केला, हेही लोकांना कळतंय. आयटी, सीबीआय, ईडी या केंद्रीय संस्था सध्या फक्त विरोधकांच्याच घरी छापे का मारतात? भाजपाची मंडळी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ, नारळाच्या पाण्यासारखी गोड आणि झऱ्यासारखी नितळ आहे, असं त्यांचं म्हणणं आहे का?

Advertisement

या प्रश्नांची उत्तरं लवकरंच मिळतील… तोपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या चारही पक्षांना आणि अजून दिशाही न सापडलेल्या मनसेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा! असंच लढत रहा… एकमेकांचे कपडे उतरवत रहा… जेणेकरुन कोण किती वंगाळ आहे, हे जनतेलाही कळेल. फक्त विनंती आहे कपडे ओढताना लंगोट सुटणार नाही आणि ओरबाडताना कुणी रक्तबंबाळ होणार नाही, याची तरी किमान काळजी घ्या…. नाहीतर लोकांच्या दारात तुम्ही मतं मागायला जाल तेंव्हा लोकंच तुम्हाला ओल्या बांबूने सडकवल्याशिवाय राहणार नाहीत. तो बांबू म्हणजे…. ईव्हीएम बरंका!

Advertisement
Advertisement

Leave a Reply