मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज दिवसभर याच मुद्द्यावर चर्चा सुरू आहेत. राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच २०२४ मध्य सुद्धा मोदीच राहणार आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात अन्य पक्षांनी एकत्र यावे यासाठी रणनिती तयार करण्याच्या उद्देशाने बैठक घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, की ‘कुणी कुणाला भेटावे याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. विरोधी किंवा सत्ताधारी पक्ष असू द्या, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी तयार करत असतात. कुणी कितीही स्ट्रॅटेजी केल्या तरी आजही मोदी आहेत, आणि २०२४ मध्ये सुद्धा मोदीच राहणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार येईल यात काहीच शंका नाही,’ असा दावा त्यांनी केला. राज्याच्या राजकारणात आज दिवसभर याच मुद्द्यावर चर्चा होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. या मुद्द्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणून आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर या घडामोडींनी आधिकच वेग घेतला आहे. भाजप विरोधी आघाडी तयार करण्यासाठी चाचपणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत. मात्र, विरोधी पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपला पराभूत करणे शक्य आहे, हे याआधीही दिसून आले आहे. त्यामुळे या काळात देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यातील अपयश, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात होत असलेली वाढ, खाद्यतेलांची भाववाढ, कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्याने मोदी सरकारची कोंडी झाली आहे. नागरिकांत सुद्धा नाराजी वाढत चालली आहे. त्यामुळे या काळात राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.