दिल्ली : उत्तर प्रदेशात भाजपने जबरदस्त विजय मिळवला आहे. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा आदित्यनाथ असतील हे निश्चित आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पदाबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार, मागील सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री होते यावेळी दोनच उपमुख्यमंत्री असणार की संख्या वाढणार, याबाबत स्पष्ट नाही. मात्र, या सरकारमध्ये 4 उपमुख्यमंत्री असणार आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचे वेगळेच राजकारण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील 403 पैकी 273 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर 125 जागांवर समाजवादी पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. 37 वर्षांनंतर देशाच्या राजकारणात भाजपने इतिहास रचला आहे. मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न नाही. मात्र, उपमुख्यमंत्री कोण असणार, याची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. चारपैकी तीन उमेदवार नवीन असतील असेही सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी ब्रजेश पाठक, केशव प्रसाद मौर्य, स्वतंत्रदेव सिंह यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदावरुन काढून संघटनात्मक कार्यात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही.
साधारण रंगपंचमीनंतर नवीन आमदारांना मंत्रीपदे आणि खातेवाटप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकज सिंह, असीम अरुण, नितीन अग्रवाल, महेंद्रसिंह, श्रीकांत शर्मा या काही उमेदवारांची नावे मंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.
दरम्यान, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळविल्यानंतर भाजपने आता मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत विचारमंथन सुरू केले आहे. या संदर्भात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक हरल्यानंतरही पक्ष काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना आणखी एक संधी देऊ शकतो, असे मानले जात आहे.
सहा महिन्यांच्या अल्प कार्यकाळात त्यांनी दिलेले योगदान याचा आधार घेता येईल. निरीक्षकांच्या उपस्थितीत धामी यांच्याकडे कमान सोपविण्याची मागणी एक-दोन दिवसांत होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होऊ शकते, अशी चर्चा आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री धामी शनिवारी किंवा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेत्यांची भेट घेऊ शकतात. मात्र, बैठकीचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.
हे तर भाजपने लोकांना दिलेले ‘रिटर्न गिफ्ट’..! ‘त्या’ मुद्द्यावर काँग्रेसची भाजपवर खरमरीत टीका..