पणजी : देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसने गोवा निवडणुकीतही एन्ट्री घेतली आहे. येथे पक्ष निवडणूक रिंगणात आहे. पक्षाचे नेते येथे प्रचार करत असून काँग्रेस आणि भाजप या दोघांवरही जोरदार टीका करत आहेत. आताही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
तृणमूल काँग्रेस विरोधी मतांचे विभाजन करत असल्याचा आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांत नाकारला. अभिषेक बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाले, की तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऑक्टोबरमध्ये समविचारी पक्षांना गोव्यातील भाजपला हुसकावून लावण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मगोपने सकारात्मक प्रतिसाद दिला तसा इतरांनी दिला नाही. आम्हाला काँग्रेसची मते फोडायची असती तर आम्ही पंजाब, राजस्थान किंवा अन्य काँग्रेसशासित राज्यांत गेलो असतो. पण, आम्ही कुठे गेलो, आम्ही त्रिपुरा, मेघालय येथे गेलो आणि भाजप सरकार असलेल्या गोव्यात आलो.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा दावा आहे, की त्यांना कोणताही ठोस प्रस्ताव दिला गेला नाही. गोव्यातील जनतेची आणि देशाची दिशाभूल करत आहेत. ढोंगीपणाला मर्यादा असावी. निर्विकार चेहऱ्याला मर्यादा असावी. आज याचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष पवन वर्मा यांनी 24 डिसेंबर रोजी त्यांना गोव्यातील नागरिकांच्या फायद्यासाठी युती करण्याचे आवाहन केले होते. पण, स्वतःच्या क्षुल्लक उद्दीष्टांच्या पुढे जाण्यात ते अपयशी ठरले.
काँग्रेसची भाजपबरोबर अस्पष्ट युती आहे. काँग्रेसला मिळालेले प्रत्येक मत हे थेट भाजपला मिळालेले मत आहे. जर काँग्रेस भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरली तर चिदंबरम यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि राजीनामा देणारे पहिले व्यक्ती व्हावे, असे आव्हान अभिषेक बॅनर्जी यांनी दिले.
Election 2022 : अखेर भाजपने ‘त्यांना’ तिकीट नाकारले; गोव्यात घोषित केले 34 उमेदवार