दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. आधीच अनेक मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिल्याने अडचणी वाढल्या असताना आता मित्र पक्षानेही साथ सोडली आहे. होय, मित्र पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजप यांच्यात युती होऊ शकली नाही. यानंतर आता जेडीयूने येथील उमेदवारांची घोषणा केली आहे. शनिवारी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश जेडीयू अध्यक्षांनी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 26 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
ललन सिंह म्हणाले की, केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आरसीपी सिंह यांनी सांगितले होते, की भाजप जेडीयू बरोबर उत्तर प्रदेशात निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर भाजप नेत्यांशी चर्चा केली. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्यांच्या (भाजप) बाजूने कोणतेही सकारात्मक उत्तर आले नव्हते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अपना दल आणि संजय निषाद यांचा पक्ष असे दोन मित्रपक्ष आहेत, असे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने सांगण्यात आले आहे, असेही ललन सिंह म्हणाले. यामध्ये त्यांनी जेडीयूचे नाव घेतले नाही.
ते म्हणाले की, जर हे आधी ठरवले असते तर आम्ही उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढली असती. आज जिथे आपण 50-60 जागांवर लढणार आहोत, तिथे शंभरवर लढलो असतो. आमचा पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जोरदारपणे लढेल आणि चांगले उमेदवार उभे करेल. मात्र, राज्यात वेगळे लढल्याने बिहारमध्ये भाजपबरोबरच्या युतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 10 फेब्रुवारीला तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्चला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
गोव्यात भाजपसमोर आव्हाने वाढली..! अनेक नाराज अपक्ष निवडणूक लढणार; भाजपला फटका बसण्याची शक्यता