लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी भाजपने आपल्या ताकदीत आणखी वाढ केली आहे. आज भाजपमध्ये काही पक्षांनी विलीनीकरण केले आहे तर काही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. आज राजधानी लखनऊ येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रीय जनक्रांती पक्ष आणि राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपामध्ये विलीन झाले आहेत. तर अन्य 5 पक्ष आणि संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या दरम्यान, राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष डॉ. एनपी सिंह यांनी भाजप माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांना विलीनीकरणाचे पत्र सुपूर्द केले. त्याचवेळी राष्ट्रीय समतावादी पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपाल निषाद यांनी विलिनीकरणाचे पत्र देऊन भाजपबरोबर काम करण्याचा संकल्प केला आहे.
पूर्वांचलमध्ये राष्ट्रीय समतावादी पक्षाचा विशेष प्रभाव आहे. पूर्वांचलच्या 25 जिल्ह्यांमध्ये पक्षाचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजपने त्यांना सोबत घेतले आहे. भाजपने स्वतःला मजबूत करण्यासाठी निषाद पक्षाशिवाय राष्ट्रीय समतावादी पक्षालाही बरोबर घेतले आहे. याशिवाय मानवतावादी समाज पक्ष, किसान शक्ती जनतंत्र पक्ष यांसह इतर अनेक संघटना आणि पक्षांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदानाने सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 55 जागांवर मतदान होणार आहे. त्याचवेळी, तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, चौथ्या टप्प्यात 60, पाचव्या टप्प्यात 60 जागांवर, सहाव्या टप्प्यात 57 आणि सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर 14 फेब्रुवारीला दुसरा टप्पा, 20 फेब्रुवारीला तिसरा टप्पा, 23 फेब्रुवारीला चौथा टप्पा, 27 फेब्रुवारीला पाचवा टप्पा, 3 मार्चला सहावा टप्पा आणि 7 मार्चला सातवा टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.