Education News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 14,500 शाळांना मॉडेल स्कूल (Model School) म्हणून विकसित करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) घोषणेचे वर्णन करून त्यांनी देशातील सर्व शाळा अपग्रेड करण्याची मागणी केली आहे. हे पत्र ट्विटरवर शेअर करत केजरीवाल यांनी लिहिले की, “माझे पंतप्रधानांना पत्र. त्यांनी 14,500 शाळा अपग्रेड करण्याची घोषणा केली. पण देशात 10 लाख सरकारी शाळा आहेत. अशाप्रकारे सर्व शाळा ठीक होण्यास शंभर वर्षांहून अधिक कालावधी लागणार आहे. आपणास विनंती आहे की सर्व 10 लाख शाळा एकत्रितपणे दुरुस्त करण्याची योजना बनवा.

अरविंद केजरीवाल, ज्यांनी एका दिवसाआधीच पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले होते, त्यांनी पत्रात लिहिले की, “मला मीडियावरून कळले आहे की केंद्र सरकारने (Central Government) देशभरातील 14 हजार 500 शाळा अपग्रेड करण्याची योजना आखली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. देशभरातील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांचे आधुनिकीकरण व सुधारणा करण्याची नितांत गरज आहे.

केजरीवाल पुढे लिहितात, की “देशभरात दररोज 27 कोटी मुले शाळेत जातात. त्यापैकी 18 कोटी मुले सरकारी शाळेत जातात. 80% पेक्षा जास्त सरकारी शाळांची अवस्था अत्यंत खराब आहे. जर आपण करोडो मुलांना असे शिक्षण देत आहोत, तर आपला देश विकसित देश कसा होईल याची कल्पना करा, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. आता  केजरीवाल यांच्या पत्राला केंद्र सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version