Edible Oil Price : देशभरात सण उत्सवांचा काळ सुरू झाला आहे. त्यात आता पामतेलाच्या किंमती वर्षभरातील सर्वात कमी पातळीवर आल्या आहेत. परंतु FMCG कंपन्या त्याचे फायदे ग्राहकांना देण्याचे टाळत आहेत. कंपन्यांच्या किमती न कमी करण्यामागे त्यांचे काही तर्क आहे. मात्र, खाद्यतेलाच्या (Edible Oil Price) दरात घसरण होत आहे. इंडोनेशियाच्या निर्बंधानंतर या वर्षी पाम तेलाच्या (Palm Oil) किमतीत वाढ झाली होती. त्यानंतर सरकारी पातळीवरील उपक्रमाचा परिणाम झाल्याने दरात घसरण झाली.
पाम तेलाचा वापर प्रामुख्याने साबणासारख्या उत्पादनांमध्ये केला जातो. पाम तेलाच्या किमती घसरल्यानंतरही FMCG कंपन्या दिलासा देण्यास नकार देत आहेत. कच्चा माल महाग झाल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दरात कपात करणे शक्य होत नाही. दुसरीकडे खाद्यतेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.
कच्च्या मालाच्या किमतीतही कालांतराने घट झाली आहे. मात्र कच्चा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोच करता येईल इतका स्वस्त झाला नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांत गहू (Wheat) आणि तांदळाच्या (Rice) किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाम तेलाचे ताजे दर प्रतिलिटर 90 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पाम तेलाच्या दरात घसरण झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या किमतीमुळे छोट्या पॅकेटवर सवलत देणे कंपन्यांना अवघड जात आहे. पण, काही कंपन्या अशा आहेत ज्या दिवाळी सणाच्या काळात काहीतरी ऑफर देऊ शकतात.