मुंबई : बदलती जीवनशैली, खाण्यात फास्टफूडचा वाढलेला वापर नि व्यायामाअभावी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातही वाढत्या वजनामुळे आज अनेक जण चिंतेत पडले आहेत. वजन कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय केले जात आहेत. काही तर जेवणच कमी करण्याचा पर्याय निवडतात. वजन कमी करताना, अनेक जण सल्ले देत असतात.. हे खा, हे नका खाऊ.. त्यामुळे अनेकांना नेमकं काय खावं, हेच समजत नाही..
वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती..? असा एक प्रश्न आहे.. बरेच जण वजन कमी करताना प्रथम चपाती खायचं सोडतात. मात्र, वजन कमी व्हायचं राहतं, बाजूला नि चक्कर येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या सुरू होतात. भारतीय लोकांचा विचार केल्यास आपले प्रमुख अन्नच भात नि रोटी आहे.. अशा वेळी दोन्हीपैकी एक सोडणे कठीण होतं.
भातामुळे लठ्ठपणा वाढत असल्याचे काहींचे म्हणणे आहे… तर काही जण चपातीपेक्षा भात हे हलके अन्न असल्याचे सांगतात. तांदूळ नि गहू ही दोन्ही तृणधान्ये असून, त्यात प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण असते. त्यातील प्रमाण पाहिल्यास भात व रोटीमध्ये फारसा फरक नसल्याचेच दिसते.. आपण दोन्हीची पोषक मूल्ये पाहिली, तर फक्त सोडियममध्ये तुम्हाला मोठा फरक पडेल. तांदळात सोडियमचे प्रमाण कमी असते, तर चपातीत जास्त..
भात खावा की चपाती..?
आहार तज्ज्ञांच्या मते, अनेकांना चपातीपेक्षा भातामुळे पोट लवकर भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे काही लोक भरपूर भात खातात. मात्र, अशा वेळी वजन वाढू शकते. चपाती किंवा भात खाणं चूकीचं नाही, तर खाण्याचे प्रमाण चूकीची आहे, असे म्हणावे लागेल.. चपाती व भात दोन्ही आरोग्यदायी आहेत, फक्त किती प्रमाणात खायचे, हा भाग आहे. वजन कमी करण्याच्या दृष्टीने पाहिल्यास चपाती अधिक फायदेशीर असल्याचे दिसते. वजन कमी करण्यासाठी भात खायचा असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी, तर तुम्ही खिचडी बनवू शकता. ज्यात डाळी किंवा भाज्यांचे प्रमाण जास्त असेल. मात्र, रात्रीच्या जेवणात शक्यतो साधी चपातीच खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.