Earthquake in Maharashtra: अहमदनगर: जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये दि. 22 नोव्हेंबर, 2022 रोजी रात्री 09.00 ते 09.30 वा. या वेळेच्या दरम्यान नागरिकांच्या घरांना हादरा बसल्याबाबतच्या तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, याबाबत भूकंपमापन केंद्र (मेरी, नाशिक) येथे जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असता भूकंपमापन केंद्रावर अशी कोणतीही भूकंपाची नोंद झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अजिबात अफवा पसरवू नये व कोणीही अशा निराधार अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाबाबत अशा अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. जर घरांना हादरा बसल्यास सुरक्षितरित्या घराबाहेर पडावे. जुनाट, मोडकळीस आलेल्या वा दगड मातीचे कच्चे बांधकाम असलेल्या घरात राहत असलेल्या नागरिकांनी विशेषतः दक्षता घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. एकूणच सोशल मीडिया आणि मेसेज व कॉल याद्वारे भूकंप झाल्याच्या बातम्या आणि अफवांचे पीक सध्या अहमदनगर, पुणे, नाशिक आणि इतर काही जिल्ह्यातील भागात जोरात आहे. (Earthquake in Ahmednagar, Pune, Nashik)