अहमदाबाद : प्रदूषणाचा विळखा आधिकाधिक घट्ट होत असताना या जीवघेण्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न होत आहे. वायू प्रदूषणास जबाबदार असणारे पेट्रोल-डिझेलचा वापर करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत आहे. देशात या वाहनांचा वापर सध्या वाढत आहे. गुजरात राज्याने मात्र आघाडी घेतली आहे. राज्यातील केवडिया शहरात फक्त इलेक्ट्रीक वाहनांना परवानगी देण्याचा विचार केल्यानंतर आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे.
राज्यात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात सरकारने आपल्या नव्या इ-व्हेईकल धोरणाची घोषणा केली आहे. या अंतर्गत राज्य सरकार पुढील चार वर्षांमध्ये ८७० कोटी रुपये अनुदान देणार आहे. इलेक्ट्रिक कार खरेदीवर १.५ लाख रुपये किंवा १०,००० रुपयांपर्यंत प्रति kWh अनुदान दिले जाणार आहे. गुजरात सरकार इलेक्ट्रिक दुचाकी वाहने आणि इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांवर अनुक्रमे २० हजार आणि ५० हजार रुपये सब्सिडी देईल. शिवाय, सर्व इलेक्ट्रिक वाहनांना नोंदणी शुल्कापासूनही सूट देण्यात येईल असे या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील चार वर्षांत किमान दोन लाख वाहने रस्त्यावर येतील, असे उद्दीष्ट राज्य सरकारने ठरवले आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे.
याआधी गुजरात सरकारने राज्यातील केवडिया शहरात फक्त बॅटरीवर चालणारी वाहनांना परवानगी देण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी क्षेत्र विकास आणि पर्यटन संचालन प्राधिकरणाने सांगितले, की या शहरात लवकरच इलेक्ट्रीक व्हेईकल ओन्ली एरिया विकसित केल जाणार आहे. त्यामुळे या शहरात केवळ इलेक्ट्रीक वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुद्धा इलेक्ट्रीक बस असतील. तसेच येथील नागरिकांना तीन चाकी ई वाहन खरेदी करण्यासाठी मदत करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, या शहरात प्रदूषण निर्माण करणारा एकही उद्योग नाही. अशा उद्योगांना येथे परवानगीच दिलेली नाही. त्यानंतर आता या शहरात प्रदूषण करणाऱ्या वाहनांना सुद्धा लवकरच नो एन्ट्री केली जाणार आहे. या पद्धतीने नियोजन केले आहे.
दरम्यान, प्रदूषण वाढत असल्याने माणसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पृथ्वीचे संकटही वाढले आहे. त्यामुळे प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्नही होत आहे. भारताने यामध्ये कायमच पुढाकार घेतला आहे. वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण ही सुद्धा एक गंभीर समस्या आहे. देशातील मोठ्या शहरात प्रदूषण वेगाने होत आहे. शहरे जसजशी विस्तारत आहेत, तसा पर्यावरणाचा धोकाही वाढत आहे. काही शहरांत तर प्रदूषणाने धोक्याची पातळी देखील पार केली आहे. त्यामुळे आता हे संकट कमी करण्याचे शहाणपण सुचले आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण पूर्णपणे कसे बंद करता येईल, याचा विचार सुरू झाला आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्याच्या योजना तयार केल्या जात आहेत.
. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.