मुंबई- एएफसी महिला आशियाई चषक स्पर्धेतून भारताला माघार घ्यावे लागले आहे. अ गटातील चायनीज तैपेईविरुद्धचा सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी संघाच्या 12 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने रद्द करावा लागला होता.
कोविड प्रकरणांव्यतिरिक्त, दोन खेळाडू दुखापतींमुळे बाहेर पडले आहे. भारताला आवश्यक किमान 13 खेळाडूंची नावे देण्यात अपयश आले. याबाबात माहिती देताना आशियाई फुटबॉल महासंघाने सांगितले की, भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेतली असून भारताचे सर्व सामने रद्द करण्यात आले आहेत.
चायनीज तैपेई संघ मैदानावर सराव करत होता मात्र भारतीय संघातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. भारत बुधवारी आपला शेवटचा गट सामना चीनविरुद्ध खेळणार होता पण तोही होण्याची शक्यता नाही. सुरुवातीची इलेव्हन बनवण्यासाठी संघाकडे पुरेसे खेळाडू नाहीत. 30 जानेवारीला बाद फेरी सुरू होईल, त्यामुळे स्पर्धेच्या आयोजकांना वेळापत्रकात बदल करणे अशक्य आहे.
आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशन (AFC) ने सांगितले की, स्पर्धेचा नियम कलम 4.1, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की जर एखाद्या संघाला सामन्यासाठी जमले नाही तर, “संबंधित स्पर्धेतून माघार घेणे” असा होतो.’
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, यावेळी उद्भवलेल्या या अनिष्ट परिस्थितीमुळे संपूर्ण देश निराश झाला आहे. मात्र, खेळाडूंच्या आरोग्याला आमच्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही परिस्थितीत तडजोड करता येणार नाही. सर्व संक्रमित खेळाडू आणि संघाचे अधिकारी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. एआयएफएफ आणि एएफसी त्याला पूर्ण पाठिंबा देतील