China : या वर्षी पहिल्यांदाच चीनने देशभरात दुष्काळाचा (Drought Alert) इशारा दिला आहे. नद्यांच्या किनाऱ्यावरील वाढत्या तापमानामुळे (Temperature) खराब होणारी पिके (Crop) आणि जंगलातील वणव्यांमुळे चीन सरकार आधीच हैराण आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी चीनमध्ये ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला. शांघायच्या नैऋत्येकडील यांग्त्झे डेल्टामध्ये एका आठवड्यात खूप जास्त तापमान आहे. यासाठी सरकारी अधिकारी वारंवार जागतिक हवामान बदलाचे (Global Climate Change) कारण सांगत आहेत. चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पोयांग सरोवर वर्षाच्या या वेळेपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरडे पडले असून येथे आता अत्यंत कमी पाणी (Water) शिल्लक राहिले आहे.
सरकारी वृत्तसंस्था सीसीटीवीने स्थानिक सरकारचा हवाला देत सांगितले, की दक्षिण पश्चिम भागातील जवळपास 66 नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. यावर्षी चोंगकिंगमध्ये या हंगामाच्या तुलनेत 60 टक्के कमी पाऊस झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जमिनीतील आर्द्रता कमी झाली आहे. त्याचवेळी, चीनच्या हवामान खात्यानुसार, चोंगकिंगच्या शहरी भागाच्या उत्तरेकडील बेईबेई जिल्ह्यातील तापमान गुरुवारी 45 अंशांवर पोहोचले. शुक्रवारी, चोंगकिंगमधील 6 ठिकाणे देशातील 10 सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये होती. येथे तापमान 39 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. तर शांघायमध्ये तापमान आधीच 37 अंशांवर होते.
चोंगकिंग प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन सेवांवर दबाव वाढला आहे. पर्वत आणि जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे अग्निशमन दल हाय अलर्टवर आहे. उष्माघाताच्या वाढत्या रुग्णांची माहिती सरकारी माध्यमे देत आहेत. काही ठिकाणी सरकारचे पुढील आदेश मिळेपर्यंत गॅस पुरवठाही बंद करण्यात आला आहे. एकूणच सध्या चीनमधील परिस्थिती भीषण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणि एकूणच प्रत्येक बाबतीत मक्तेदारी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला हा निसर्गाने दिलेला मोठा झटका आहे.