दिल्ली : सरकारने तिकीट दरावरील कमाल मर्यादा काढून टाकल्यानंतर विमान कंपन्यांनी भाडेवाढ सुरू केली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत यावर्षी डिसेंबरमधील प्रवासासाठी कंपन्या काही महत्त्वाच्या मार्गांवर दुप्पट भाडे आकारत आहेत. तर दुसरीकडे विमानाअभावी उड्डाणांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एका अहवालात असे म्हटले आहे, की डिसेंबर यात्रा हंगामात देशांतर्गत प्रवाशांना हवाई भाड्यात सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे. क्लियरट्रिपच्या प्रवक्त्याने सांगितले की, हिवाळा आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान विमान भाडे जास्त असते. ते म्हणाले, की या वर्षी किमती वाढलेल्या मागणीमुळे प्रभावित झाल्या आहेत. कारण बहुतेक लोक कोरोनामुळे दोन वर्षांच्या अंतरानंतर त्यांच्या सुट्टीचे नियोजन करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की महागड्या हवाई तिकिटांचे एक प्रमुख कारण म्हणजे विमानांची कमतरता आहे, त्यापैकी काही देखभाल आणि इंजिनशी संबंधित समस्यांमुळे बंद आहेत.
ऑनलाइन ट्रॅव्हल ऑपरेटर EasyGo च्या वेबसाइटनुसार, 21 ते 31 डिसेंबर दरम्यान प्रवासासाठी नवी दिल्ली-मुंबई मार्गावरील भाडे सप्टेंबरमध्ये 5,500 रुपये आणि मेमध्ये 9,000 रुपये ते डिसेंबरसाठी 15,000 ते 20,000 रुपये झाले आहे. म्हणजेच या मार्गावरील भाडे जवळपास दुप्पट झाले आहे. नवी दिल्ली-गोवा मार्ग 40 टक्के आणि नवी दिल्ली-बेंगळुरू मार्ग 15 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, बेंगळुरू-कोलकाता मार्गावरील भाड्यात 44 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
एव्हिएशन अॅडव्हायझरी फर्म CAPA च्या मते, 75 पेक्षा जास्त विमाने किंवा सुमारे 10-12 टक्के फ्लीट ग्राउंड केले गेले आहेत, ज्यामुळे आधीच प्रतिकूल खर्चाच्या वातावरणात भारतीय विमान कंपन्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. CAPA म्हणते, की पुरवठा साखळीतील गंभीर संकटामुळे विमान कंपनीच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. हे संकट पुढील आर्थिक वर्षातही पाहायला मिळू शकते, असेही संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांसह प्रवाशांच्याही अडचणी वाढताना दिसत आहेत.
- Must Read : Air Travel Tips : प्रथमच विमानाने करत असाल प्रवास तर या चार चुका टाळा
- Airport News: DGCA चा धक्कादायक अहवाल, इतके विमानतळ कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत पकडले