सोलापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूरला जाणा-या भावीकांसाठी ही बातमी नक्कीच आनंददायी ठरणार आहे. आता सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने स्वत:चा आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नवा रेल्वेमार्ग लवकर आणि वेळेत होईल असे राज्य सरकारने सांगितले आहे.
यामागे देशातील सर्व तीर्थक्षेत्रे एकमेकांना दळणवळणाने जोडण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्या तीन-चार दशकांपासून केली जात होती. ती आता लवकरच पुर्ण होणार आहे. या नव्या रेल्वेमार्गाची लांबी ८४.४४ किलोमीटर आहे. या नव्या रेल्वेमार्गादरम्यान एकूण दहा रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील मिळून ३३ गावांतून हा नवा रेल्वेमार्ग जाणार आहे. त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया सध्या प्रगतिपथावर असताना निधीअभावी अडचणीही आहेत. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी एकूण ९०४ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात राज्य सरकारचे ५० टक्के योगदान आहे. राज्य सरकारने आपला संपूर्ण आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरकरांसह तुळजापूर आणि उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ासह दक्षिण भारताला जोडणारा म्हणून हा नवा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे .तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वेच्या जाळय़ात येण्याची मागणी मात्र आतापर्यंत दुर्लक्षित होती. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर केंद्र सरकारने सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली. याबाबत सर्वेक्षणही झाले होते. चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकारने या नव्या रेल्वेमार्गासाठी प्रतीकात्मक स्वरूपात २० कोटीं रुपयांचा निधी तरतूद केला होता.
must read